सीमावाद चिघळला, कर्नाटकात मुख्यमंत्री शिंदे यांच्या पोस्टरचे दहन
कर्नाटकमधील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी वाढलेली दिसतेय. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं कार्यकर्त्यांनी गदगमध्ये दहन केलं आहे. त्यामुळे वाद अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवासंपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमावादावरून वादंग निर्माण झाला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रविरोधी वातावरण निर्माण झाल्याने सीमावादाचा प्रश्न केंद्राने सोडवावा, अशी मागणी मविआच्या खासदारांनी केली आहे. त्यासंदर्भात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून शहा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी १४ डिसेंबरला चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन केल्याने कर्नाटकातील मराठी भाषिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मराठी भाषिक भागात महाराष्ट्रविरोधी लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गदगमध्ये महाराष्ट्राविरोधात जोरदार निर्दशने केली आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर चढून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रविरोधी घोषणाबाजी केली.