सांगोल्याची जागा आम्हीच लढवणार, त्यावर चर्चा नाही; संजय राऊतांनी ठामपणे सांगितले, सोलापूर दक्षिणवरही ठाकरे गटाचा दावा
मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार येईल. निकाल लागल्यानंतर या राज्यामध्ये 26 तारखेला महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेलं असेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. निवडणुकीत काळात कोण काय म्हणतंय? आणि कोण काय आरोप करतंय? हे गांभीर्याने घ्यायचं नसतं. आधी जिंकून या…बारामती आता सोपी राहिलेली नाही, असा टोलाही संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला.
धमक्यांचं राजकारण बंद केलं पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःचीच सुरक्षा वाढवून घेतली. जनतेची सुरक्षा वाऱ्यावर आहे, खून, बलात्कार, कोयता गँग, खंडण्या, मारामाऱ्या लुटमार आणि अचानक राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोर्स वन आपल्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. जनतेला कळलं पाहिजे, या राज्याच्या गृहमंत्र्यांना कोणापासून धोका निर्माण झालाय?, इस्राईल, युक्रेन, लिबिया, दक्षिण कोरिया?, नेमकं कोणापासून धोका आहे?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. आम्हाला चिंता वाटते देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत, त्यांच्या कुटुंबाला त्यांची जेवढी काळजी आहे, तेवढी आम्हाला सुद्धा आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
आम्ही मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पडणार नाही- संजय राऊत
भिवंडीच्या ज्या जागेवर आमचे माजी आमदार रुपेश म्हात्रे सांगतायत. ती जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करतोय पण समाजवादी पार्टीचा विद्यमान आमदार तिथे आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्या जागेसाठी प्रयत्न केले पण समाजवादी पार्टीने ती जागा सोडली नाही, अशा वेळेला आमच्याकडे दुसरा कोणताही प्रयत्न राहत नाही, असंही संजय राऊतांनी सांगितले. आम्ही मैत्रीपूर्ण लढतीमध्ये पडणार नाही, महाराष्ट्रामध्ये सात ते आठ ठिकाणी असं घडणार आहे. आज आणि उद्या दुपारपर्यंत आमच्याकडे वेळ आहे. त्यातून आम्ही मार्ग काढू, काही ठिकाणी दोन एबी फॉर्म गेले आहेत. काही ठिकाणी गैरसमजातून घडलं आहे आणि काही ठिकाणी का घडलं? याचा आम्ही शोध घेतोय. पक्षाचे नेते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत, सगळे उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
सांगोल्यावर चर्चा होणार नाही- संजय राऊत
सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेस पक्षाने अधिकृत एबी फॉर्म कोणालाही दिलेला नाही. तिथे शिवसेनेचे अमर पाटील हेच उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा पुढल्या आठवड्यात होत आहे. सांगोल्याची जागा शिवसेनेची विद्यमान जागा आहे. सांगोल्यामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला. असल्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहील. शेतकरी कामगार पक्षांबरोबर काल सुद्धा आमची चर्चा झाली. त्यामध्ये अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन जागांवर चर्चा होऊ शकते. सांगोल्यावर चर्चा होणार नाही, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिले.