अजित पवारही म्हणतात, मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; ना फडणवीस ना शिंदे, दादांच्या मते बेस्ट CM म्हणजे…
मुंबई : महायुतीला १७५ चा आकडा पार करणं अवघड नसावं, निकाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराचा निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आमच्या कौटुंबिक बाबींवर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. माझे संपूर्ण लक्ष विधानसभा निवडणुकीवर आहे, असे अजितदादांनी स्पष्ट केले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
यूटर्न घेतलेला नाही
शरद पवार-अमित शाह यांची गौतम अदानींसोबत भेट झाल्याचा दावा करुन नंतर यूटर्न घेतल्याप्रकरणी अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, यावर ते म्हणाले की यू-टर्न घेण्याचा प्रश्नच येत नाही. ही बैठक झाली असली, तरी तिला अदानी उपस्थित नव्हते. राजधानी दिल्ली येथे सरकार स्थापनेसाठी अनेक बैठका झाल्या. मी, प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांसह काही बैठकांना उपस्थित राहिलो. शरद पवारांच्या वक्तव्यावर माझी कोणतीही प्रतिक्रिया नाही; राज्यात गुंतवणुकीसाठी ते उद्योगपतींच्या भेटीगाठी घेत आहेत, असं अजित पवार म्हणाले.
लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद
लाडकी बहीण आणि इतर योजना आम्ही पूर्ण ताकदीने राबवू. आम्ही सर्व योजनांसाठी ७६ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. एकूण बजेट परिव्यय ६.५ लाख कोटी रुपये आहे, तर पगार, पेन्शन आणि कर्जावरील व्याज ३.५ लाख कोटी रुपये आहे. त्यामुळे खर्च भागवण्यासाठी आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे मला वाटते. याउलट, महाविकास आघाडीने दिलेल्या ‘पाच हमीं’ची अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही, कारण त्यांची एकूण किंमतच ३.५ लाख कोटी रुपयांच्या घरात आहे, असंही अजित पवार म्हणाले.
विलासराव बेस्ट मुख्यमंत्री
मला अनेक मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या मते दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख हे सर्वोत्कृष्ट सीएम होते. आपण युतीच्या राजकारणाच्या युगात आहोत. राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्य पातळीवर एकाच पक्षाचे सरकार येण्याची शक्यता नाही. विलासरावांनी आघाडी सरकारचे नेतृत्व करण्याची रणनीती तयार केली होती, अशा शब्दात अजितदादांनी कौतुक केलं.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही
दरम्यान, मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. महायुती विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत निकालानंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. काल देवेंद्र फडणवीस यांनीही शर्यतीतून माघार घेतल्यानंतर आता दादांनीही आपली भूमिका मांडली आहे.