solapur

‘महायोगिनी अक्कमहादेवी’ कादंबरीचे गुरुवारी प्रकाशन

सोलापूर येथील प्रा. डॉ. श्रुती श्री. वडगबाळकर लिखित व सुविद्या प्रकाशन प्रकाशित जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अनुभव मंटपातील शरणी अक्कमहादेवी यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘महायोगिनी अक्कमहादेवी’ या कादंबरीचे प्रकाशन गुरुवारी होणार असल्याची माहिती वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 अक्कमहादेवींचे चरित्र हे तर एक महाकाव्यच आहे. एक स्त्री सुद्धा अध्यात्माच्या क्षेत्रात उच्च कोटीच्या अलौकिक पदाला पोहोचू शकते. या अनुभविक वास्तवतेचे एक ज्वलंत आदर्शवत व प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अक्कमहादेवी होय.  त्यांच्या जीवनावरील या कादंबरीमध्ये चन्नमल्लिकार्जुनावरील अगाध श्रद्धा, भक्ती वर्णन केली आहे. यामध्ये अक्कमहादेवीच्या खडतर प्रवासाची, अनुभव मंटपातील संवादाची, वचनातील सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेची वर्णने सहजतेने आलेली आहेत. या दृष्टीने ही कादंबरी वाचनीय झाली आहे.
 गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा व लेखिका प्रा. डॉ. श्रुती श्री. वडगबाळकर, साहित्यिका डॉ. स्मिता पाटील, अक्कनबळग महिला मंडळाच्या ट्रस्ट अध्यक्षा सुरेखा बावी, प्रकाशक बाबुराव मैंदर्गीकर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे.
शरणी अक्कमहादेवी यांच्यावर कन्नड भाषेत अनेक पुस्तके आहेत. मराठी भाषेत नाहीत. महाराष्ट्रातील तमाम लोकांना अक्कमहादेवींचे माहात्म्य समजावे हा या कादंबरीचा मुख्य हेतू आहे
 या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वीरशैव व्हिजनच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस लेखिका प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर, प्रकाशक बाबुराव मैंदर्गीकर, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, सचिन विभुते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button