sports
टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनल, फायनलसाठी आयसीसीने बदलले नियम
- टी 20 विश्वचषकाचा अखेरचा आठवडा सुरू झाला आहे. साखळी फेरीतील केवळ चार सामने शिल्लक असले तरी, न्यूझीलंड वगळता अद्याप तीन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होणे बाकी आहे. असे असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पर्धेच्या उपांत्य फेरी व अंतिम सामन्यासाठी एक निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिका संघाला दोन सामन्यात पावसामुळे नुकसान सहन करावे लागले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हा बहुप्रतीक्षित सामना देखील पावसामुळे रद्द करावा लागला होता. तसेच पावसामुळे लागू केल्या गेलेल्या डकवर्थ लुईस नियमामूळे सामन्यांना निर्णायक कलाटणी दिसून आली.
या सर्व घडामोडींच्या दरम्यान आयसीसीने स्पर्धेच्या उपांत्य फेरी व अंतिम फेरीसाठी नवे नियम लागू केले आहेत. - आयसीसीच्या नियमानुसार कोणताही टी20 सामना हा दोन्ही संघांनी कमीत कमी पाच षटके खेळल्यानंतरच पूर्ण होऊ शकतो. परंतु, 1 ऑक्टोबरपासून लागू केल्या गेलेल्या नव्या नियमानुसार आयसीसी टी 20 विश्वचषकातील बाद फेरीच्या सामन्यांमध्ये सामना पूर्ण होण्यासाठी दोन्ही संघांनी प्रत्येकी 10 षटके फलंदाजी करणे आवश्यक आहे.
उपांत्य व अंतिम फेरीसाठी राखीव दिवस देखील ठेवण्यात आले आहेत. सामन्याच्या मुख्य दिवशी खेळ पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी, ज्या ठिकाणी पहिल्या दिवसाचा खेळ थांबलेला तेव्हापासून सामना सुरू होईल. - उपांत्य फेरीचे सामने पूर्णच होऊ शकले नाही तर, साखळी फेरीत अव्वल असलेला संघ अंतिम फेरीत मजल मारेल. अंतिम फेरीचा सामना देखील पूर्ण न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद बहाल केले जाईल. यापूर्वी अखेरच्या वेळी 2002 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत व श्रीलंका संघाला संयुक्त विजेतेपद दिले गेले.