दोरी समजून उचलायला गेले अन् निघाला साप – कुठे घडली हादरवणारी घटना ?
सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथे एका इसमाच्या घरात अत्यंत दुर्मिळ असा साप सापडला आहे. खरंतर तो इसम त्या सापाला दोरी समजला होता. दोरी समजून तो साप उचलायला गेला तेवढ्यात त्या विषारी सापाने चावा घेण्यासाठी तोंड उचललं होतं, पण त्या इसमाने प्रसंगावधान दाखवत हात झटकन पाठीमागे घेतल्याने तो थोडक्यात बचावला. मात्र यामुळे सांगलीच्या पलूस तालुक्यात चांगलीच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. त्यांनी त्या सापाला कडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं.
बॉक्सजवळ पडलेली दोरी उचलायला गेले पण अचानक
मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल येथे सुमारे 20 वर्षांनी अत्यंत दुर्मिळ फुरसे जातीचा असा हा साप आढळला असून त्याची लांबी साधारणत: 25 सेमी असल्याचे समजते. प्रशांत गायकवाड यांच्या घरात हा विषारी साप आढळला. ते सायंकाळी घरात येऊन सोफ्यावर बसले असता त्यांना घरात ठेवलेल्या एका बॉक्सजवळ दोरी सारखे काहीतरी पडलेले दिसले. ते पाहून त्याला दोरी समजून ते उचलायला गेले अन तेवढ्यात त्या विषारी सर्पाने हाताच्या दिशेने आपले तोंड उचलले असता, मात्र चपळाईने त्यांनी हात पाठीमागे घेतल्याने बचावले. त्यांनी तात्काळ सर्पमित्र हणमंत माळी यांना फोन करुन बोलावले. त्यांनी या दुर्मिळ सर्पाविषयी माहिती दिली. आणि घराशेजारीच डोंगर असल्याने तिथून तो आला असावा असे सांगितले व तो सर्प पकडून नेऊन नैसर्गिक अधिवासामध्ये सोडला.
महाराष्ट्रात नाग, मण्यार, घोणस, फुरसे या चार विषारी सापांच्या जाती आढळतात. नाग, मण्यार, घोणस हे विषारी सर्प सर्वत्र आढळत असले तरी फुरसे हा विषारी सर्प कोकण भागात जास्त प्रमाणात सापडत असल्याचे सर्पमित्र नीळकंठ जोंजाळ, तेजस फासे, वर्धन जोंजाळ यांनी सांगितले. या सर्पाचे खादय प्रामुख्याने विंचू, लहान किडे, सरडे, पाली आहेत. कुंडल येथील डोंगराळ परिसरात या सर्पाचे अस्वित्व असल्याचे समोर आले आहे. हे सर्प डोंगराळ भागातील दगडाखाली तसेच प्राण्यांची बिळे, दगडातील भेगा, अशा अनेक ठिकाणी लपून बसतात.