75 हजार लाडक्या बहिणींकडे चारचाकी! प्रशासनाकडे आली यादी, घेतला मोठा निर्णय

पुणे: राज्यातील लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) महिला लाभार्थ्यांच्या घरोघरा जाऊन निकषांची तपासणी केली जात आहे. महिलांच्या घरी चारचाकी आहे का, त्या निकषांत बसतात की नाही, याची चाचपणी करण्यास सुरूवात झाली आहे. महिला व बालकल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. योजनेचे खरे लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करताना तिजोरीवर अधिक भार येणार नाही, यासाठी सरकारने खबरदारी घेण्याची चर्चा विभागात सुरू आहे. अशातच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे चारचाकी असलेल्या लाडक्या बहिणींंची यादी आली आहे. शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील 75 हजार 100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे समोर आले आहे. या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
अशी आहे स्थिती
21 लाख 11 हजार 991 एकूण अर्ज
20 लाख 89 हजार 946 लाभ मिळालेल्या बहिणी
75 हजार 100 चारचाकी वाहने असलेल्या बहिणी
राज्य शासनाकडून प्रत्येक परिवहन विभागाकडून यादी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. या यादीनुसार प्रत्येक जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन याबाबतची पडताळणी करणार असल्याची माहिती आहे. पुणे जिल्ह्यासाठीच्या दोन याद्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आल्या आहेत.
यामधील पहिल्या यादीत 58 हजार 350, तर दुसऱ्या यादीत 16 हजार 750 अशी एकूण 75 हजार 100 वाहनधारकांची यादी प्रशासनाच्या हाती आली आहे. या यादीतील नावे तालुकानिहाय संबंधित अधिकाऱ्यांना दिली जाणार आहेत, त्यानंतर प्रत्यक्षात पडताळणीचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी ऑनलाईन पध्दतीने बैठक घेत सोमवारी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना ‘लाडक्या बहिणींच्या’ घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासंबंधीचे आदेश दिले होते, त्यानंतर पडताळणी साठीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. स्वतःहून महिलांनी लाभ सोडावा, असं आवाहन शासनाने केलं होतं, त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता पडताळणी करण्याचं कडक पाऊल उचललं आहे. योजनेच्या संदर्भात पडताळणी होऊ शकते, याचा अंदाज आधीच प्रशासनाला आला होता. त्यामुळे प्रशासनाकडून या पार्श्वभूमीवर आधीच तयारी सुरू केली होती, तर अंगणवाडी सेविकांनीच बहुतांश अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरले असल्यामुळे त्यांना त्यांच्या परिसरात असलेल्या महिलांची माहिती आहे. अंगणवाडी सेविकांची अगोदरच तशी तयारी झालेली आहे. त्यामुळे पडताळणीचे काम कमी कालावधीत होऊन शासनाला अपात्र लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडून पाठवणार आहे, अशी माहिती समोर आली आहे..
आलेली नावे केवळ लाभार्थी वाहन धारकांचीच
शासनाकडून देण्यात आलेली यादी ही वर्गवारी करून पाठवली आहे. केवळ योजनेच्या लाभार्थी महिलांच्या नावे वाहन असलेली किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे वाहन असलेल्यांची ही यादी आहे. त्यामध्ये इतर वाहन धारकांची यादी नाही. त्यामुळे या यादीत फक्त योजनेच्या संबंधित महिलांचीच यादी जिल्हा प्रशासनाला मिळालेली आहे.