solapur
महिलांच्या नेतृत्व विकासावर सोलापुरात डिसेंबरमध्ये कार्यशाळा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वुमेन सेल आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे (एमएसएफडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या नेतृत्व विकासावर पाच दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
- ही कार्यशाळा 16 ते 20 डिसेंबर 2022 यादरम्यान विद्यापीठात होणार आहे. शैक्षणिक संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी, नवीन व्यवस्थापकीय आव्हाने प्रभावीपणे हाताळण्यासाठी, महिलांचे नेतृत्व विकसित करून त्यांना कौशल्याने सक्षम करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या महिला अध्यापन आणि प्रशासकीय पदावर कार्यरत आहेत, त्यांच्याकरिता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राचार्य, अधिष्ठाता व इतर प्रशासकीय पदावर कार्यरत असणाऱ्या महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेसाठी ज्या महिला बाहेर गावावरून येणार आहेत, त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था आहे. कार्यशाळेचे नोंदणी शुल्क एक हजार रुपये असून नोंदणीची अंतिम तारीख 4 डिसेंबर 2022 आहे.
प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेचे नियोजन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. माया पाटील या आहेत. कार्यशाळेच्या सहसमन्वयक तेजस्विनी कांबळे (9860067388) यांच्याकडे नाव नोंदणी करता येईल. सदर कार्यशाळेचा उच्च शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे यांनी केले आहे.