solapur
सोलापुरातील व्हीआयपी रस्त्यांचे भाग्य उजळले मात्र इतर रस्त्यांचे काय?
जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त यांनी येत्या आठ दिवसात सोलापूर शहरातून पूर्णपणे जड वाहतूक बंद करावी अन्यथा जनतेतून रास्ता रोको आंदोलन करून जड वाहतूक बंद करण्यात येईल, जनतेचा अंत पाहू नका – निरंजन बोध्दूल, जड वाहतूक विरोधी कृती समीती निमंत्रक.
सोलापुरातील व्हीआयपी रस्त्याचे भाग्य अखेर उजळले आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. विशेषता सात रस्ता, हॉटेल प्रथम, गांधीनगर, महावीर चौक या रस्त्याची दुरुस्ती होत आहे. व्हीआयपी रस्त्याची दुरुस्ती होत असताना शहरातील इतर रस्त्यांचे काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे जुना बोरामणी नाका, शांती चौक, अशोक चौक गुरुनानक चौक येथील रस्त्यांची अवस्था खेडेगावासारखी आहे.
शहरातील त्रस्त पिडीत नागरिक जुना बोरामणी नाका- अशोक चौक-गुरुनानक चौक हा रस्ता तातडीने पूर्ण नव्याने बनवण्यात यावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रार, मोर्चा, निवेदने, आंदोलने करुनही रस्ते दुरुस्ती व नवीन रस्ता बनवला गेला नाही.
या दरम्यान शेकडो लोकांचा बळी या रस्त्याने घेतला आहे.कुणाला अपंगत्व तर कुणाला गंभीर दुखापत झाली.दररोज अपघात होतात.सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.या रस्त्यात पाणी साठून दुचाकी व चारचाकी गाड्या बंद पडत आहेत. तसेच याचा सर्वात जास्त फटका विद्यार्थी,कामगार आणि सर्वसामान्य जनतेला बसत आहे.याकरिता हा रस्ता तातडीने बनवण्यात यावा करीता जडवाहतुक कृती समितीच्या वतीने निमंत्रक निरंजन बोध्दूल यांच्या पुढाकाराने सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली असून सर्वांनी सहभाग नोंदवून स्थानिक प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ही झाला. यामध्ये एका दिवसात शहरातील (1500 )पंधराशे च्या वर नागरिकांनी स्वाक्षरी करून आपले समर्थन दर्शवले.ही दखलपात्र बाब आहे.
वास्तविक पाहता हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. या रस्त्यावर 24 तास वर्दळ चालूच असते. या रस्त्यावरून दयानंद महाविद्यालय, कुचन महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय,एस.व्ही.एस. महाविद् यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळकरी मुले, विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार छोटे मोठे दुकानदार इ.सायकलस्वार आणि पादचारी याच रस्त्याचा अवलंब करतात.तसेच आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रभर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी राज्य परिवहन सेवा देणारी वाहने या मार्गावर धावतात. या रस्त्यावरुन प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली आहे.