solapur
विद्यार्थ्यांनी घेतली सोलापूर झेडपी सीईओंची ‘क्लास’
बालदिनानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ व उळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन त्यांची मुलाखत घेतली.
स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? मला काय बनायचे ? तुमचे कार्यालय एवढे छान कसे ? मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे काय ? असे चिकित्सक प्रश्न यावेळी विद्यार्थ्यानी सीईओंना विचारले. प्रश्न विचारण्यात मुलींनी बाजी मारली. त्यामुळे त्या मुलींचे कौतुक सीईओंनी केले. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळते. प्रेरणा मिळते. यातूनच भावी अधिकारी घडतील असे यावेळी सीईओ म्हणाले. स्वामी यांनी पदानुसार अधिका-यांचे कामकाज कसे चालते याबाबत सोप्या शब्दात माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासोबतच या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, दक्षिण सोलापूरचे तहसिलदार अमोल कुंभार, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ आणि गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांच्या कार्यालयास भेटी दिल्या.
यावेळी गटशिक्षणाधिकारी बनसोडे यांनी मुलांना बालदिनाचे महत्व सांगितले. मोठे स्वप्ने पहा व ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. यश हमखास मिळेल. तसेच स्वतःची ड्रिम डायरी तयार करा आणि त्यानुसार आपले उद्दिष्ट गाठा, असे सांगितले. बनसोडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मुलाखतीनंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत प्रश्न विचारून माहिती घेतली. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत मुलांना मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांसोबत गप्पा मारताना विद्यार्थ्यांच्या चेह-यावर जिज्ञासुपणा व आनंद दिसून येत होता.
यावेळी शिक्षणाधिकारी संजय जावीर, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, शिक्षण विस्तार अधिकारी राजशेखर नागणसूरे, जयश्री सुतार, स्वाती स्वामी, गोदावरी राठोड, शेख, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व गटसाधन केंद्रातील विषयसाधन व्यक्ती उपस्थित होते.