india world
महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला का गेले? गडकरींनी सांगितले सत्य, म्हणाले…
तीन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच नागपूरातला एक प्रोजेक्टही तेलंगणात गेला आहे. त्यामुळे आता राज्यात संतापाची लाट उसळलेली असतानाच या प्रकरणावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
कोणत्याही राज्यात औद्योगिक प्रोजेक्ट सुरू करायचा असेल तर त्याबाबतचे कोणतेही अधिकार राज्य सरकारच्या हातात नसतात. याबाबत कोणत्या राज्यात गुंतवणूक करायची, याचा सर्वस्वी अधिकार उद्योजकांना असतो, असं म्हणत गडकरींनी राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याच्या मुद्यावर बचावात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात अनेक औद्योगिक कंपन्या आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच मर्सिडिज कंपनीचा मोठा प्रोजेक्ट पुण्यात आला आहे. आधी मुंबई-पुण्यातच विकास होत असल्याचं बोललं जायचं. परंतु आता मराठवाडा आणि विदर्भातही औद्योगिक प्रकल्प येत असल्याचे गडकरी म्हणाले.
औद्योगिक प्रकल्पांसाठी कोणत्याही नेत्यांवर अथवा राज्य सरकारांवर दबाव नाही. काही लोक कारण नसताना यावरून वाद घालत आहेत आणि मीडियाही अशा घडामोडींना प्रतिसाद देत असल्याचे गडकरी म्हणाले.