राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर सत्तेसोबत जाणार; वंचित नेते प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यभरात जोरदार प्रचार केला जात आहे. या निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना राजकीय खलबत देखील रंगू लागली आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मोठे विधान केलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुक निकालानंतर आम्ही सत्तेसोबत जाणार असल्याचे मोठे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले आहे. अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे वंचित आगामी काळात नेमका काय पवित्रा घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
निकालानंतर महायुती आणि मविआचे पर्याय खुले- प्रकाश आंबेडकर
राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाज प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन असून सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्त्वाचं वाटतं. या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. तर ‘बटेंगे तो कटेंगे”च्या मुद्द्यावरही आंबेडकरांनी भाजपवर प्रहार केला आहे. विकासाचे मुद्देच नसल्यामुळे भाजप मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. माध्यमं जाणीवपूर्वक वंचितकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोपही आंबेडकरांनी यावेळी बोलतांना केला आहे. ते अकोला येथे बोलत होते.
सत्ताधारी पक्ष अळ्या पेक्षा अळ्या झाला आहे-प्रकाश आंबेडकर
तुम्ही सभागृहात गेल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तरीही तुम्ही भाजपाला मतदान करत असाल तर तुम्हाला कोण वाचवेल? अनेक वर्ष काँग्रसने सत्ता केली. त्यानंतर भाजप आल मात्र काय बदल झाला? तरी तुम्ही काँग्रेस आणि भाजपाला मतदान करता. साचलेल पाणी गढूळ होतं, त्यामुळे ते पाणी आपण पित नाही. कारण त्यात अळ्या असतात. असाच सत्ताधारी पक्ष अळ्या पेक्षा अळ्या झाला आहे. अशी टीका ही प्रकाश आंबेडकरांना बुलढाणा येथील सभेतून सरकारवर केली आहे. मी ओबीसींना सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण गेलं. आता सुप्रीम कोर्टाच्या नावाने विधानसभा झाल्या की शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.