Friday, October 18, 2024
Homepoliticalसांगोला विधानसभा उमेदवारीसाठी टशन; शहाजीबापूंना जुन्या मित्राची, तर देशमुख बंधूंमध्येही स्पर्धा

सांगोला विधानसभा उमेदवारीसाठी टशन; शहाजीबापूंना जुन्या मित्राची, तर देशमुख बंधूंमध्येही स्पर्धा

 

सांगोला:- सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही रस्सीखेच दिसून येत आहे. मागील निवडणुकीत एकत्र असलेले शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे यांच्यात उमेदवारीसाठी महायुतीत स्पर्धा आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्षाला ही जागा सुटणार असून शेकापकडून डॉ.अनिकेत देशमुख आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत निवडणुकीपूर्वीच उमेदवारीसाठी लढाई पाहायला मिळणार आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघातून मागील 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर शहाजीबापू पाटील हे निवडून आले होते. शहाजीबापू पाटील यांना त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी पाठिंबा दिला होता.

वास्तविक संपूर्ण महाराष्ट्रात शेकाप-राष्ट्रवादीची युती असताना सांगोल्यात मात्र साळुंखे-पाटील यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांनी 764 मतांनी डॉ.अनिकेत देशमुख यांचा पराभव केला होता.

आता तेच दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांनी सर्व्हेही केला आहे, त्यामुळे दीपकआबा साळुंखे यांनी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसून आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मागील निवडणुकीतील एकमेकांचे सहकारी दीपकआबा साळुंखे आणि शहाजीबापू पाटील यांच्यात उमेदवारीवरून स्पर्धा रंगणार आहे. महायुतीमध्ये सांगोला मतदारसंघ विद्यमान आमदार असल्यामुळे शहाजीबापू पाटील यांना सुटण्याची शक्यता आहे. मात्र, साळुंखे-पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीतील मित्रांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा रंगणार आहे.

महाविकास आघाडीत सांगोल्याची जागा शेतकरी कामगार पक्षाला सुटण्याचे निश्चित आहे. या मतदारसंघातून डॉ.बाबासाहेब देशमुख हे निवडणूक लढवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून तयारी करत आहेत. शेकापची गेल्या पाच वर्षांत त्यांनी तालुक्यात बांधणीही केली आहे, त्यामुळे डॉ.बाबासाहेब यांना आगामी निवडणुकीसाठी शेकापची उमेदवारी मिळेल, असे वाटत असतानाच लोकसभा निवडणुकीपासून मात्र डॉ.अनिकेत देशमुख यांनीही निवडणूक लढविण्यासंदर्भात भाष्य केले आहे.

लोकसभा निवडणुकीत डॉ.अनिकेत देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, शरद पवार यांच्या भेटीनंतर ती घोषणा त्यांनी मागे घेत महाविकास आघाडीचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता. मात्र, आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासोबतच डॉ.अनिकेतही शेकापच्या उमेदवारीसाठी दावा करत आहेत, त्यामुळे या दोन बंधूंपैकी शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोण माघार घेणार, याकडे सांगोला तालुक्याचे लक्ष असेल.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी निवडणुकीच्या अगोदरच इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा दिसून येत असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments