टांझानियाची टिकली अन् नायझेरियाची लिपस्टिक, महिला आयोगात शो पीस बाहुल्या; सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर निशाणा
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. महिला आयोगात शो पीस बाहुल्या आहेत, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. महिला आयोगात शो पीस बाहुल्या आहेत. शो पीस बाहुल्या म्हणून काम करणाऱ्या, सोयिस्करवादाच्या धनी असलेल्या यांच्या महिला कार्यकर्त्या. महिलांच्या प्रश्नांवर काही बोलत नाहीत. चकार शब्द काढत नाहीत. नुसतं टुकू टुकू… अशानं प्रश्न सुटत नाहीत. उगाच अंगावर महागडी साडी नेसून स्वदेशी अंबाड्यात मेड इन अमेरिकाच्या प्लॅस्टिक फुलांचा गजरा माळून, केसात इंग्लंडचं बक्कल, टांझानियाची टिकली अन् नायझेरियाची लिपस्टिक चिकटवून, ब्राझीलवरून आणलेल्या उंच- उंच चपला पायात घालून महिला मुक्तीवर बोलतात, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर टीका केली आहे.
आम्हीही सिनेमा काढणार- अंधारे
आपली भावजय अमृता फडणवीस बोलल्या देवेंद्र तोंड झाकून गेले, असं म्हणत सुषमा अंधारेंनी अमृता फडणवीस यांची नक्कल केली. तुम्ही रात्रीच्या अंधारात गेला कारण तुमच्या पोटात पाप होतं. तुम्ही पाठीत खंजीर खुपसणारे होतात होय एकनाथ शिंदे तुम्हाला उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं. तुमच्यासारखा माणूस गद्दारी करू शकतो आणि पाठीत खंजीर खुपसू शकतो याचे उद्धव ठाकरे यांना कल्पना नव्हती. आता ते पिक्चर काढायला लागले. धर्मवीर सत्ता आल्यावर आम्हीही पिक्चर काढू…..आम्ही लहानपणी बघितला होता अलीबाबा चालीस चोर…आता आम्हाला त्याचा सिक्वल टू काढायचा आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी शिंदं गटावर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदेंवर निशाणा
बाष्कळ विनोद करणं मुख्यमंत्रिपदावरच्या व्यक्तीला शोभत नाही. फक्त हे विनोद करणं नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजाराची टिंगल उडवणं आहे. जे कुठल्याही चांगल्या व्यक्तीला अशोभनीय आहे. एकनाथ शिंदे कडून आम्ही यापेक्षा वेगळ्या बाष्कळपणाची अपेक्षा करत नाही, अशी शब्दात सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्रातील मनसैनिक चांगला मनसैनिक आहे. या मनसैनिकांना वारंवार आपल्या मनाला मुरड घालावी लागते. निर्णय घेताना दोन वेळेला त्यांचे नेते त्यांना अडचणीत आणतात. मी त्याही दिवशी म्हटलं तुम्ही तुमच्या एका जागेसाठी सर्वच मनसैनिकांचा जीव घेता. सर्व मनसैनिकांबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे, असंही अंधारे म्हणाल्यात.