maharashtrasolapur

सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाला मोठा धक्का बसलाय. सोलापूर डीसीसी बँकेचे 238 कोटी 43 लाख रुपयांचे अनियमित कर्ज वाटल्याने झालेल्या नुकसानीस तत्कालीन संचालक मंडळास जबाबदार धरण्यात आलंय. ही रक्कम व्याजासह वसुल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे यांच्यासह 33 जणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सोलापूरच्या डीसीसी बँकेच्या संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या कारखान्याना कर्ज वाटल्याची तक्रार बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी 2010 साली दिली होती. या प्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम 88 अन्वये झालेल्या चौकशीत बँकेच्या आर्थिक नुकसानीस तत्कालीन संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले आहे. 238 कोटी 43 लाख रुपये आणि कर्ज उचलल्यापासून 12 टक्के व्याजासह रक्कम निश्चित करण्यात आली आहे. चौकशी अधिकारी किशोर तोष्णीवाल यांनी ही रक्कम व्याजासह वसूल करावी, असे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाचे मुख्य तक्रारदार असलेले बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी निकालानंतर समाधान व्यक्त केलं. 14 वर्ष सुरु असलेल्या लढ्याला यश असल्याची भावना आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली.

Related Articles

Back to top button