अजित पवारांच्या गंभीर आरोपांनंतर आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या राजकारण आता वेगळ्या दिशेला जाताना दिसत आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षांकडून उमेदवारांची घोषणाबाजी केली जात आहे. अनेक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. यानंतर आता प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीच्या तासगाव येथील सभेत राज्याचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. फाईल तयार केली. अजित पवारांची ओपन चौकशी करण्याची सही आर. आर. पाटील यांनी केली. वाईट वाटले. आपलं काहीतर चुकलं असेल. पण आपल्याला कामाला लावून गेला. त्या फाईलवर आबांनी केलेली सहीबद्दल देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मला कोणी सही केली हे दाखवलं होतं”, असा धक्कादायक दावा अजित पवारांनी केला. त्यांच्या या आरोपांवर आता आऱ. आर. आबा यांचे पुत्र रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
“खरंतर आज आबांना जावून नऊ ते साडे नऊ वर्षे झालेली आहेत. अशापद्धतीची टीका आबा हयात असताना केली असती तर आबांनी त्यांना फार चांगलं उत्तर दिलं असतं. आजल नऊ, साडे नऊ वर्षांनंतर म्हणजे आबा गेले त्यावेळेला माझं वय साधारण 15 वर्षे होतं. मी आता त्या गोष्टीला उत्तर देऊ शकत नाही. आणि ते बोलणंही योग्य नाही. कारण अजित दादा वरिष्ठ आहेत. आम्ही गेली 9 वर्षे अजित दादांच्या नेतृत्वात काम केलं आहे. अगदी ताकदीचं काम केलं. असं असताना तासगावमध्ये अशाप्रकारच्या टीका आबांवर केल्या जात असतील तर कुटुंबीय म्हणून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा याचं दु:ख होतंय”, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली.
‘कर नाही तर डर कशाला?’
“मला त्याबाबतचं उत्तर देणं योग्य वाटत नाही. पण एखादी गोष्टी केली नसेल तर कुणी घाबरायची आवश्यकता नाही. ग्रामीण भागात कर नाही तर डर कशाला? अशा पद्धतीची एक म्हण आहे. पण आज आबा असते तर ते याबाबत बोलले असते. नऊ-साडे नऊ वर्षांनंतर अजित दादांनी असं बोलून दाखवणं हे तासगाव आणि कवठे महाकाळमधील स्वभिमानी नागरिकांनी नक्कीच पटलेलं नाही”, असा दावा रोहित पाटील यांनी केला.
आरोपांचं आम्ही खंडन करतो’
“अजित पवार यांना अशाप्रकारचं वक्तव्य करुन त्यातून सिद्ध काय होणार होतं याची मला कल्पना नाही. आबांनी गृहमंत्री म्हणून काम करत असताना अतिशय पारदर्शकपणे महाराष्ट्रात काम करुन दाखवलं होतं. मग त्यामध्ये डान्सबार बंद करण्याचा निर्णय असेल, पोलीस दलाबाबत निर्णय घेतला. पोलीस दलात ग्रामीण भागातील घराघरातील मुलं भरतीसाठी परीक्षेला उतरली आणि ते भरती झाले, पोलीस झाले, गावगड्यात फिरणारा माणूस पोलीस झाला. संबंध महाराष्ट्राला आबा गृहमंत्री म्हणून अभिमान वाटला. आज अशा पद्धतीने कोणतेही आरोप आबांवरती केले जात असतील त्यांचं आम्ही खंडन करतो”, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली.
#रोहित पाटील
#अजित पवार