सांगोल्याजवळ दुचाकीची टिपरला धडक; मुलाचा मृत्यू
सांगोला : शेतीच्या कामासाठी आलेल्या शेतकरी पिता- पुत्राच्या दुचाकीची रोड लगत थांबलेल्या टिपरला पाठीमागून जोरदार धडक बसली. अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री १०:३० च्या सुमारास सांगोला ते पंढरपूर जाणाऱ्या रोडवरील बिलेवाडी पाटी, सांगोला येथे घडला. आबासाहेब खांडेकर (वय ३६) असे मृत मुलाचे नाव आहे. गुंडा खांडेकर (५५, दोघेही रा. देवळे, ता. सांगोला) असे जखमी पित्याचे नाव आहे.
देवळे येथील शेतकरी गुंडा खांडेकर यांच्या शेतात ऊसतोडणी चालू आहे. ते मुलगा आबासाहेब खांडेकर यांच्या सोबत दुचाकीवरून मोकळ्या ट्रॉलीचे वजन बघण्यासाठी सांगोल्यात आले होते. वजन काट्यावर ट्रॉलीचे वजन करून पुन्हा दोघे पिता-पुत्र डिझेल घेऊन दुचाकीवरून सांगोला ते देवळे पंढरपूर रोडने घराकडे निघाले होते. वाटेत बिलेवाडी पाटी येथे रोडच्या साईडला थांबलेल्या टिपरचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीची टिपरला पाठीमागून जोराची धडक बसून हा अपघात घडला.