maharashtratop news

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन

बेळगाव: ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक, सिमालढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड (comrade) कृष्णा मेणसे यांचे सोमवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या निवासस्थानी  निधन झाले. निधन समयी ते 97 वर्षाचे होते. सिमालढ्याचा चालता बोलता इतिहास आणि अन्यायाच्या विरूध्द आवाज उठवणारा कामगार नेता अशी त्यांची ओळख होती. अप्पा म्हणून ते निकटवर्तीयात परिचित होते. त्यांच्या पश्चात  प्रा. आनंद मेणसे, ॲड. संजय मेणसे, कन्या सौ. लता पावशे, नीता पाटील व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. सोमवारी रात्री आठ वाजता त्यांच्यावर सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

कट्टर कम्युनिस्टवादी ,उत्तम वक्ते, सीमा सत्याग्रही, लेखक, संपादक असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. बेळगाव सह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. आपल्या विचारांशी प्रामाणिक असणारा नेता अशी त्यांची ओळख होती.गोवा मुक्ती आंदोलनात देखील त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी त्यानी समर्थपणे पार पाडली होती.शाळकरी विद्यार्थी असताना ते गांधीजींना भेटण्यासाठी घरात न सांगता गेले होते.गांधीजींना भेटून त्यांनी संवाद साधल्यावर गांधीजींनी त्यांना परत कार्यकर्त्याला सांगून बेळगावला पाठवले होते.

गेल्या आठ दशकाहून अधिक काळ   श्रमिक, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आणि बिदर-भालकी, बेळगांव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपले आयुष्य वेचणारे कॉ. कृष्णा मेणसे यांना काही दिवसापूर्वी  राष्ट्रवीर कार पुरस्काराने गौरविण्यात आले होते.कर्नाटक ,महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते.बसवेश्र्वरांच्या वचनांचा अनुवाद मराठीत केला होता. गोठलेली धरती पेटलेली मने हे त्यांचे प्रवास वर्णन प्रसिध्द आहे.त्यांची अनेक पुस्तके प्रसिध्द झाली असून काहीना पुरस्कार देखील लाभले आहेत.साम्यवादी या साप्ताहिकाचे ते संस्थापक होते.

Related Articles

Back to top button