सांगोला शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर; शनिवार दि.7 जून 2025

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Sangola Breaking News; महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, सांगोला तालुक्यातील घडामोडी पाहा एका क्लिकवर, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडे्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

सांगोल्यात जलसंपदा विभागाची क्षेत्रीय विभागीय कार्यालये होणार – चेतनसिंह केदार सावंत
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली होती निवेदनाद्वारे मागणी

सांगोला (प्रतिनिधी):- टेंभू, म्हैसाळ, नीरा, स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या सिंचन प्रकल्पा अंतर्गत सांगोला तालुक्यातील 44 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून सुमारे 1600 हेक्टर वरील सिंचन प्रकल्प प्रस्तावित असून, सदर प्रस्तावित प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन, प्रकल्प कार्यन्वित करण्यात आले आहेत. प्रशासकीय तसेच क्षेत्रीय कामासाठी लाभधारकांना सुमारे 100 किमी प्रवास करून हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी सर्व सिंचन प्रकल्पाची क्षेत्रीय कार्यालये व विभागीय कार्यालये सांगोल्यात व्हावीत अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीला यश आले असून सांगोल्यात लवकरच जलसंपदा विभागाची क्षेत्रीय कार्यालये होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
वीर धरणाअंतर्गत नीरा उजव्या कालव्याचे सांगोला शाखा कालवा क्रमांक 4 व 5 द्वारे तालुक्यातील सुमारे 10 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. परंतु सदर प्रकल्पाचे विभागीय कार्यालय नीरा उजवा कालवा विभाग फलटण ता. फलटण जिल्हा सातारा येथे आहे. म्हैशाळ उपसा सिंचन योजने अंतर्गत तालुक्यातील सुमारे 4 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे व 0.8 टीएमसी इतके पाणी उपलब्ध आहे. सदर योजनेचे विभागीय कार्यालय म्हैशाळ पंपगृह विभाग क्रमांक 2 सांगली ता. सांगली जिल्हा सांगली येथे आहे. टेंभू उपसा सिंचन योजने अंतर्गत तालुक्यातील सुमारे 20 हजार हेक्टर सिंचनाखाली आहे व 3 हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने सिंचन करण्याचे प्रस्तावित आहे.
या योजने अंतर्गत तालुक्यात 4.5 टीएमसी पाणी उपलब्ध असून सदरच्या योजनेचे विभागीय कार्यालय टेंभू उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी ता. कराड जिल्हा सातारा येथे आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या अंतर्गत तालुक्यातील 13 हजार हेक्टर क्षेत्र सिंचन करण्याचे प्रस्तावित आहे. सदर योजनेचे विभागीय कार्यालय उजनी कालवा विभाग क्रमांक 9, मंगळवेढा ता. मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे आहे. याशिवाय तालुक्यात माण नदीवरील 14 को.प.बंधारे, कोरडा नदीवरील 2 को.प. बंधारे असून 14 लघु व एक मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. सदर प्रकल्पावरील सिंचन क्षेत्र सुमारे 10 हजार हेक्टर इतके आहे. परंतु सदर प्रकल्पाचे क्षेत्रीय व प्रशासकीय कार्यालय भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर ता. पंढरपूर येथे आहे.
वरील सर्व सिंचन प्रकल्पा अंतर्गत तालुक्यातही सुमारे 44 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून सुमारे 1600 हेक्टर वरील सिंचन प्रकल्प प्रस्तावित असून, सदर प्रस्तावित प्रकल्पाची भूमिपूजन होऊन, प्रकल्प कार्यन्वित करण्यात आलेले आहेत. या सर्व बाबीचा विचार करता प्रशासकीय तसेच क्षेत्रीय कामाकरिता तसेच अन्य बाबी करीत इतक्या मोठ्या क्षेत्रातील लाभधारकांना संबंधित काम करीत सुमारे 100 किमी प्रवास करून हेलपाटे मारावे लागतात. त्या करीत उपरोक्तच्या सिंचन प्रकल्पाची क्षेत्रीय कार्यालये व विभागीय कार्यालये सांगोला व्हावीत.

 

वनविभाग व रोटरी क्लब यांचेकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धायटी येथे वृक्षारोपण

सांगोला (प्रतिनिधी):- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त धायटी येथे रोटरी क्लब सदस्य व निवृत्त वन अधिकारी रो.माणिक भोसले यांच्या पुढाकाराने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वनविभाग सांगोला, रोटरी क्लब सांगोला व धायटी ग्रामपंचायत यांचे मार्फत श्री.क्षेत्र बिरोबा मंदिर धायटी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी श्री.जहांगीर खोंदे वनपाल,श्री.गोवर्धन वरकटे वनरक्षक, वनविभाग सांगोला,रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.विकास देशपांडे,रो.माणिक भोसले, रो.विलास बिले, रो.श्रीपती आदलिंगे, रो.विजय म्हेेत्रे, रो.गोविंद माळी, रो.प्रवीण मोहिते, रो.अरविंद डोंबे यांच्या हस्ते तसेच धायटी ग्रामस्थ श्री. प्रकाश देवकते, श्री.औदुंबर भोसले,श्री. गोवर्धन तांबे, श्री.नानासो हांडे, श्री.दगडू गायकवाड, श्री.सुभाष कोळेकर, श्री कुंडलिक मोरे, श्री साहेबराव बंडगर, अध्यक्ष आचंद्र काळे श्री.समाधान लेगरे, श्री.बीरा कोळेकर, श्री.बाळू कोळेकर पुजारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विविध प्रजातीच्या 100 वृक्षाची लागवड करण्यात आली. याप्रसंगी रो. माणिक भोसले यांनी यावर्षीची पर्यावरणाची थीम प्लास्टिक प्रदूषण टाळा या विषयी माहिती दिली.तसेच लावण्यात आलेल्या रोपांची जबाबदारीने जोपासना करण्याची विनंती केली. तसेच रो.अरविंद डोंबे यांनी पर्यावरण पूरक माहिती देऊन उत्कृष्ट घोषणा दिल्या.

 

सांगोला ट्रॉमा सेंटर तात्काळ सुरू करा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

सांगोला (प्रतिनिधी) – सांगोला, येथे बांधकाम पूर्ण झालेल्या ट्रॉमा सेंटरमध्ये अत्यावश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देऊन व कर्मचारी भरती करून हे केंद्र तात्काळ सुरू करावे, याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मागणी केली
सांगोला येथे उभारण्यात आलेल्या ट्रॉमा सेंटरची इमारत सुसज्ज असूनही अद्याप ते कार्यान्वित करण्यात आलेले नाही. आवश्यक यंत्रसामग्री, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर तांत्रिक कर्मचार्‍यांची कमतरता असल्यामुळे हे महत्त्वाचे ट्रॉमा निष्क्रिय स्थितीत आहे.
सांगोला तालुक्यातून नागपूर-रत्नागिरी आणि इंदापूर-जत हे दोन प्रमुख महामार्ग जात असल्यामुळे या भागातील वाहतूक प्रचंड आहे. परिणामी, अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता कायम असते. अपघातग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असून, हे ट्रॉमा सेंटर नागरिकांसाठी जीवनदायी ठरू शकते.
सध्या अपघातग्रस्त रुग्णांना सोलापूर, पंढरपूर, मिरज, येथे हलवावे लागते, ज्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि जीवितहानी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे बांधकाम पूर्ण झालेले सांगोला ट्रॉमा सेंटर तातडीने कार्यान्वित करून परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी खासदार मोहिते पाटील यांनी केली आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री ना.मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून 06 जून शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात आलेले होते त्या अनुषंगाने परमवीर चक्र विजेता लान्स नाईक करम सिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,सांगोला या संस्थेमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला.
कार्यक्रमास सांगोला विधानसभा सदस्य आ.बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थिती राहून मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडवणीस यांनी व्हिडिओद्वारे ऑनलाईन पद्धतीने केले व त्यानंतर मुख्य सचिव कौशल्य ,रोजगार, उद्योजकता विभागाचे श्रीमती मनीषा वर्मा मॅडम यांनी सर्व उपस्थिताना ऑनलाइन पद्धतीने संबोधित केले. कार्यक्रमाची सुरुवात आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरुवात झाली.
आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास मांडला व त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन युवकांनी महाराजांचे विचार आचरणात आणण्यास सांगितले.
अ‍ॅड.गजानन भाकरे व उद्योजक श्री.राजेंद्र वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रमुख वक्ते प्रा.श्री.सुरेश लवटे सर यांनी स्वदेशी प्रसार व सामाजिक समरसता या विषयावरती स्वदेशी विचारांचे महत्त्व कुटुंब प्रबोधन ,पर्यावरणाचे महत्त्व, शिष्टाचार यांची सविस्तर माहिती सांगितली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आय.एम.सी सदस्य श्री.प्रसाद फुले, रोटरी क्लब अध्यक्ष इंजि.विकास देशपांडे, सचिव इंजि.विलास बिले, माजी रोटरी क्लब अध्यक्ष इंजि.अशोक गोडसे, आय.एम.सी सदस्य श्री.गणेश घोडके, पत्रकार श्री.दीपक ऐवळे इ. मान्यवर उपस्थित होते.
श्री.प्राचार्य ओंबासे डी.वाय यांच्या मार्गदर्शनाखाली सूत्रसंचालन श्री.कांबळे व्ही.एस तसेच कार्यक्रमाचे आभार श्री.शिकलगार जे.ए.मानून कार्यक्रमाची सांगता केली. तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

 

सांगोला फॅबटेक अभियांञिकी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल

सांगोला (प्रतिनिधी):- फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील विद्युत अभियांञिकी विभागाच्या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्युत अभियांञिकी विभागात द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर, सांगली येथील जयसिंगपूर मधील श्रीम इलेक्ट्रिकल लिमिटेड आणि सांगली येथील क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लिमिटेड या कंपनीस भेट दिली. या भेटी दरम्यान कंपनीतील अभियंता सावंत यांनी विद्यार्थ्यांना कपॅसाटरचे उत्पादन करण्याच्या वेगवेगळया पद्धती समजून सांगितल्या. तसेच त्यावर करण्यात येणार्‍या वेगवेगळया चाचण्यांची महत्वपूर्ण माहिती दिली. क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये उत्पादित होणार्‍या इंडक्विव रिक्टची माहिती कंपनीतील अभियंता माने यांनी विद्यार्थ्यांना दिली.
यामध्ये विद्युत अभियांञिकी विभाग प्रमुख प्रा.हणमंत मल्लाड, प्रा.माने, प्रा.विजय पाटील, प्रा.प्रणव शिंदे सह विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

 

जवळे ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

जवळे (प्रशांत चव्हाण):- संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन शुक्रवार दिनांक 6 जून 2025 रोजी जवळे ग्रामपंचायत कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी जवळा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.सज्जन मागाडे व जवळा विकास सोसायटीचे चेअरमन श्री. सुनील आबा साळुंखे-पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदरप्रसंगी उपसरपंच श्री.नवाज खलिफा, श्री.अनिल सुतार, श्री. सिद्धेश्वर साळुंखे, ग्रामपंचायत अधिकारी श्री.रसाळ भाऊसाहेब, श्री.सुमित साळुंखे, श्री.सज्जन गायकवाड, श्री.संदीप साळुंखे, श्री.आकाश साळुंखे, श्री.शिरसू स्वामी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

 

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व गटशेती साठी शेतकर्‍यांनी पुढाकार घ्यावा-दिपाली जाधव
खरीप हंगाम 2025 संदर्भात चोपडी येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- सध्या पारंपरिक शेतीला बदलते स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गटशेती करणे महत्त्वाचे आहे. नवनवीन तंत्रज्ञानातून आपणास गटशेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळू शकेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी एकत्र आल्यानंतर पीक लागवडीपासून विक्री व्यवस्थेपर्यंत एकत्रितपणे अभ्यास करून शेती विकसित करणे फायद्याचे ठरणार आहे. कृषी विभागाच्या वतीने पीकस्पर्धा घेण्यात येत असून शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते. सध्या शासनाने शेतकर्‍यांना फार्मर आयडी आवश्यक केला आहे. शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन सांगोला तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी चोपडी येथे शेतकर्‍यांसाठी आयोजित मार्गदर्शन मोहीमे प्रसंगी केले.
5 जून 2025 रोजी चोपडी – रानमळा येथे आयोजित केलेल्या शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमप्रसंगी तालुका कृषीअधिकारी व कार्यालयातील अधिकारी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तसेच खरीप हंगाम 2025 मोहीम राबवून कृषी विभागाच्या योजनांची सखोल माहिती शेतकर्‍यांना दिली.
या कार्यक्रमासाठी जुनोनी मंडल कृषी अधिकारी भाग्यश्री पाटील, उपकृषी अधिकारी सतीश देठे, सहाय्यक कृषीअधिकारी समाधान गवळी , हातीद सहाय्यक कृषी अधिकारी व्हि.के वाघमारे, सहाय्यक कृषी अधिकारी बाळासाहेब सावंत ,सहाय्यक कृषी अधिकारी एस .बी. शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी एम. एल .माळी, कृषीमित्र बाळासाहेब बाबर आदी उपस्थित होते .
जुनोनीचे उपकृषी अधिकारी सतीश देठे यांनी कृषी विभागाच्या शेतकर्‍यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी समाधान गवळी यांनी मनरेगातून फळबाग लागवड व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड यासाठीचे निकष, अटी त्यासाठी शेतकर्‍यांना देण्यात येणारे अनुदान या संदर्भात माहिती दिली.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी बाळासाहेब सावंत व सहाय्यक कृषी अधिकारी व्हि.के. वाघमारे यांनी शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया कशी करावी व त्याचे फायदे या संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी सुरेश बाबर, गोरख चव्हाण, किसन बाबर, सिद्धेश्वर बाबर, अमोल बाबर, समाधान बाबर, वैभव बाबर, प्रकाश बाबर, सचिन खळगे, बाळासाहेब बाबर, तानाजी बाबर, विनोद चव्हाण ,विशाल बाबर, लालासाहेब जगदाळे, अजिनाथ बाबर, प्रवीण बाबर, कैलास चव्हाण ,बबलू बाबर, भगवान बाबर, अतुल बाबर, भगवान बाबर फौजी, वसंत बाबर, संभाजी बाबर , विजय बाबर, सतीश पाटील, प्रताप पाटील, नवनाथ बाबर, भाग्यवंत पाटील, कविता बाबर, मनीषा खळगे, छाया चव्हाण, श्रीमाबाई बाबर ,दिलीप बाबर, दिनेश बाबर, समाधान बाबर, संकेत बाबर, सिद्धनाथ गुरव, सदाशिव बाबर, काकासाहेब बाबर आदी शेतकरी बांधव व भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल बाबर यांनी तर आभार कन्सल्टिंग विनायक बाबर यांनी मानले.

 

जलतारा योजनेचा शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्या- पो.नि.विनोद घुगे

सांगोला (प्रतिनिधी):- जलतारा योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी फायदा करुन घ्या. या उपक्रमासाठी शासनाचे चार हजार आठशे रुपये अनुदान मिळत आहे.तरी शेतकर्‍यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्या, असे मत सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी व्यक्त केले.
बुधवार दि 4 जुन रोजी ग्रामपंचायत सभागृह अजनाळे येथे एकात्मिक पर्यटन विकास महामंडळ व जलतारा व अजनाळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, सरपंच अनिता पवार, समन्वयक भरत काळे, तावडे, दादासाहेब खाडे, संचालक विजय येलपले, ग्रामपंचायत अधिकारी संदीप सरगर, कृषी पर्यवेक्षक मधुकर चव्हाण, कृषी सहाय्यक विवेक पाटील, चंद्रकांत पवार सीआरपी चैत्राली भंडगे, आरोग्य सेविका सिंधू गडदे, आरोग्य सेवक डॉ अशोक कलाल, माजी उपसरपंच अर्जुन येलपले,आशा वर्कर ज्योती येलपले, पल्लवी धांडोरे, रंजना येलपले, सारिका आवटे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना घुगे म्हणाले की, शेतकर्‍याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे जलतारा हा शेतकर्‍याच्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे तसेच सौर ऊर्जा वृक्षारोपण सेंद्रिय शेती या बद्दल सविस्तर मार्गदर्शन करून शेतकर्‍यांना माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार डॉ. अशोक कलाल यांनी मानले. या कार्यक्रमाला शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

 

शक्तीपीठ रद्द करा; माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना निवेदन

सांगोला (प्रतिनिधी):- एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, शक्तीपीठ महामार्ग नाझरे, वजरे येथील बाधित शेतकरी यांचे उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असल्याने, येथील बागायत कसलेल्या जमिनीतून गेला त्यामुळे जगणे शेतकर्‍यांचे मुश्किल झाले आहे व यासाठी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, याबाबतचे नाझरे व वझरे येथील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील व तहसीलदार संतोष कणसे यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे.
नाझरे गावापासून 4 किलोमीटर अंतरावर नागपूर रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग आहे व त्या मार्गास शक्तिपीठ जोडावा यासाठी वेगळा शक्तीपीठ येथून करण्याची गरज नाही व त्यामुळे आम्ही जमिनी देणार नाही हा महामार्ग रद्द करा अशी विनंती यावेळी शेतकर्‍यांनी केली आहे. यावेळी बाधित शेतकरी दादासो वाघमोडे, डॉ. सोनवणे, रविराज शेटे, दीपक शिरदाळे, दत्तात्रय बनसोडे, सचिन बनसोडे, संजय बनसोडे, गुरुलिंग पाटील, बाळासो सरगर, काशिनाथ पाटील, अल्लम प्रभू पाटील, दत्तात्रय देशपांडे ,अशोक बनसोडे, महादेव बनसोडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

 

डॉ.सोमनाथ पोखरे यांची डाळिंब उत्कृष्टता केंद्र क्लस्टर प्रमुखपदी निवड

सांगोला:- राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.सोमनाथ पाखरे यांची भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एकीकृत बागवानी विकास मिशन (एम. आई. डी. एच.) अंतर्गत असणार्‍या भारत व इस्राइल सहयोगी कृषी प्रकल्प (आय आय ए पी ) मधील तीन राज्यामधील डाळिंब उत्कृष्टता केंद्र (सी ओ इ) साठी क्लस्टर प्रमुख म्हणून निवड झाली.
ही डाळिंब उत्कृष्टता केंद्रे (सी ओ इ) महाराष्ट्र (महात्मा फुले कृषि विद्यापीठ (एम पी के वी), राहुरी); फलोत्पादन विज्ञान विद्यापीठ (यु एच एस) बागलकोट, कर्नाटक व धिंडोल (बस्सी) जयपूर, राजस्थान येथे आहेत.
या तिन्ही केंद्राचे समन्वय व वार्षिक कार्यक्रम आखणी तसेच या राज्यांमध्ये डाळिंब पिकासाठी व शेतकर्‍यांसाठी विशिष्ट प्रशिक्षण, कार्यशाळा आणि तांत्रिक कार्यक्रमांचे नेतृत्व आणि समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांचावर आहे.

 

कमलापूर ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम – दिव्यांग बांधवांना निधी वाटप

कमलापूर( प्रतिनिधी ):- कमलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधीचे वितरण करण्यात आले. समाजातील जो वंचित,गरजू ,दुर्लक्षित, शोषित,पीडित दिव्यांग घटक आहेत त्या घटकाला कमलापूर ग्रामपंचायतीने न्याय देण्याचे काम कमलापूर ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले. यामध्ये 45 लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहर्‍यावर एक वेगळा आनंद होता. या निधीचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास त्यांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल होऊ शकतो. फुल नाय फुलाची पाकळी देऊन ग्रामपंचायत कमलापूर यांनी त्यांचा सन्मान केला. गेल्या पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायत कमलापूरच्या वतीने अशी विविध उपक्रम हाती घेण्यात आले.
यामध्ये ग्रामसेवक संजय खटकाळे, सरपंच रावसाहेब अनुसे, उपसरपंच नितीन काळे,शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबुराव बंडगर देविदास ढोले,तंटामुक्तीचे उपअध्यक्ष सोमनाथ अण्णा अनुसे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश (राजू) गोडसे, प्रा.एन. डी. बंडगर, भगवान अनुसे, दिलीप बंडगर, इंजि.सागर अनुसे, राहुल ऐवळे, संजय बंडगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

रामकृष्ण मंगल कार्यालयाच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाच्या परिसरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने शाळकरी मुले, दूधवाले, गवळी, शेतकरी वर्ग आणि भेटीसाठी येणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या संदर्भात शशिकांत हरिदास गेजेगे, सचिन शिवाजी पवार, वैभव सूर्यवंशी, सचिन घुटकुडे, बापू लेंडे, अंकुश लिंगप्पा मेटकरी, सचिन गायकवाड, सुखदेव पवार, सुभाष पाटोळे, मोहन डिगोळे, तानाजी काका पाटील, कुमार जगताप, सतीश अन्नवरे यांसह अनेक शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यावरून चालणे धोकादायक बनले असून, लहान मुलांना शाळेत पाठवताना पालकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे.
या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी यावर त्वरित कार्यवाही होणे आवश्यक आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Kitchen Recipe: घरच्या घरी तयार करा झटपट तयार होणारं आणि टेस्टी, पोटभरीचं ‘चिकन सँडविच’, नोट करा Recipe

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon