मोठी बातमी, आयपीएलच्या 18 व्या हंगामाची तारीख फिक्स, कधीपासून सुरुवात होणार?

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 18 व्या मोसमाला (IPL 2025) केव्हापासून सुरुवात होणार? क्रिकेट चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. बीसीसीआयची मुंबईतील मुख्यालयात रविवारी 12 जानेवारी रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. राजीव शुक्ला यांनी या बैठकीनंतर याबाबतची माहिती दिली आहे. मात्र अद्याप आयपीएलच्या 18 व्या मोसमाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. या हंगामाला केव्हापासून सुरुवात होईल? तसेच राजीव शुक्ला काय म्हणाले? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबईत झालेल्या या विशेष एजीएममध्ये आयपीएल 2025 बाबत निर्णय घेण्यात आल्याचं राजीव शुक्ला यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं. तसेच शुक्ला यांनी तारीखही सांगतली. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन कुठे होणार, हे देखील निश्चित करण्यात आलं आहे. त्याबाबतही लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असं शुक्ला यांनी सांगितलं. याआधी 14 मार्चपासून 18 व्या हंगामाला सुरुवात होईल, असं इसपीएन क्रिकेइन्फोने दिलेल्या वृत्तात म्हटलं होतं. मात्र आता शुक्ला यांनी तारीख सांगितली असल्याने अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात झाला आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात झाली होती. तेव्हा सलामीच्या सामन्यात बंगळुरु विरुद्ध चेन्नई आमनेसामने होते. तर अंतिम सामना हा 26 मे रोजी पार पडला होता. केकेआरने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात हैदराबादला पराभूत 12 वर्षांनी आयपीएल ट्रॉफी उंचावली होती. केकेआर गतविजेता असल्याने आता या 18 व्या हंगामातील अंतिम सामना हा कोलकातामधील इडन गार्डनमध्ये होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघांनी संयुक्तरित्या 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. त्यामुळे आता या 18 व्या हंगामात कोणती टीम ट्रॉफी जिंकते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांना या हंगामाच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा असेल, हे मात्र निश्चित.