Bus Accident: बस दरीत घरंगळत जाऊन झाडाला अडकली, धरणात पडता पडता वाचली
रत्नागिरी: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस रविवारी रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत घरंगळत गेली. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून बस तिथेच थांबली. ही बस आणखी पुढे घरंगळत गेली असती तर ती धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात झाला त्यावेळी एसटी बस रविवारी रात्री मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. यापैकी एका उतारावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली घरंगळत जात होती. बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या दरीच्या खालच्या बाजला धरण होते. ही एसटी बस आणखी खाली घरंगळत गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, दरीतील एका झाडला धडकून एसटी बस तिथेच अडकून पडली. यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्यामुळे बसपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला. तोपर्यंत अनेक प्रवाशी बसमध्ये जीव मुठीत धरुन बसले होते.
ही बस दरीत कोसळल्यानंतर एका बाजुला पूर्णपणे आडवी पडली होती. या अपघातावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एसटी बसच्या मागच्या भागात अडकलेले प्रवासी दिसत आहेत. हे प्रवासी ज्यांना शक्य आहे त्यांना बसमधून बाहेर पडा असे सांगत आहेत. जितक्या लोकांचा जीव वाचेल तेवढे जण वाचतील, तुम्ही बाहेर पडा, असे हे प्रवासी इतरांना सांगतानाचे व्हिडीओत ऐकायला येत आहे. हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही.