राज्यात 27 ते 29 डिसेंबरदरम्यान गारपीटीचा इशारा, कुठे पावसाचा अंदाज ?
राज्यभरात सध्या विविध ठिकाणी हवामानाची वेगवेगळी परिस्थिती असून जालना आणि धुळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यामध्ये आज तुरळक पाऊस होऊ शकतो तर 27 आणि 28 तारखेला येलो अलर्ट जारी करण्याच आला आहे. गारपीट, वीज आणि वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आलं आहे.
मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्र कडून आज जालना जिल्ह्यात तुरळ ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली तर 27 आणि 28 तारखेला जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून गारपीट,वीज आणि वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असा आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलंय.शिवाय आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा अस देखील सांगण्यात आलं आहे.
धुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण
गेल्या दोन दिवसापासून धुळे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून शहरावर धुक्याची चादर पसरली आहे. संपूर्ण धुळे शहर धुक्याच्या कवेत आहे. हवामान खात्याच्या इशारानुसार 27 आणि 28 रोजी ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता असून यामुळे शेतकरी मात्र धास्तावला आहे. हवामान खात्याच्या इशारानुसार 27 आणि 28 रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता चा इशारा देण्यात आल्याने शेतकरी धास्तावला असून रब्बी पिकं धोक्यात आली आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर कीड पडण्याची शक्यता झाली असून शेतकऱ्यांनी फवारणी करण्याचा सूचना हवामान खात्याने दिले आहेत .
मुंबईत हवेचा दर्जा खालावला
गेले काही दिवस मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावू लागला आहे. ‘समीर’ अॅपच्या नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदला जात आहे. मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी 191 इतका होता. काही भागांत ‘अतिवाईट’ तर, काही भागांत ‘वाईट’ हवेची नोंद झाली. वातावरणातील घातक पीएम 2.5 आणि पीएम 10 धुलीकणांचे प्रमाणही वाढले आहे. बोरिवली येथे बुधवारी सायंकाळी ‘अतिवाईट’ हवेची नोंद झाली. तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक 304 नोंदवला गेला. त्याचबरोबर देवनार, कांदिवली, मालाड, नेव्ही नगर, कुलाबा, शिवडी, वरळी परिसरातही ‘वाईट’ हवेची नोंद झाली.