भाजप नेत्यानंच सुरू केली लाडकी बहीण योजना, 1100 रुपयांचे वाटप सुरू; बंगल्याबाहेर महिलांची मोठी गर्दी
नवी दिल्ली : राज्यातील लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. महाराष्ट्रात महायुतीला तब्बल 237 जागांवर विजय मिळाला असून भाजपने 132 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान पटकावला आहे. त्यामुळे, राज्यात निवडणुकीच्या निकालानंतरही लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) चर्चेत आली. त्यातच, आजपासून या योजनेच्या लाभार्थींना डिसेंबर महिन्याची रक्कमही मिळण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा निवडणुकीत झालेला फायदा लक्षात घेत आता दिल्लीच्या (Delhi) विधानसभा निवडणुकांपूर्वीच दिल्लीतील केजरीवाल सरकारने महिला सन्मान योजना नावाने महिलांसाठी दरमहा 1000 रुपये देण्याची योजना जाहीर केली आहे. विशेष म्हणजे त्याची नोंदणी देखील सुरु करण्यात आल्याने दिल्लीत सध्या या योजनेचीच चर्चा आहे. त्यातच, भाजप (BJP) नेत्याने चक्क खासगी स्वरुपात महिलांना 1100 रुपये देत लाडली योजना सुरू केल्याचं उघडकीस आलं आहे. आपच्या नेत्यांनी या घटनेचे व्हिडिओही शेअर केले आहेत.
दिल्लीमध्ये पुढील दोन महिन्यात विधानसभा निवडणुकांचां बिगुल वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जिंकलेल्या भाजपने आता दिल्लीची तयारी सुरू केली आहे. त्यातूनच, दिल्लीचे माजी खासदार आणि भाजप नेते परवेश शर्मा यांच्याबाबत खळबळजनक घटना समोर आली आहे. या नेते महोदयांच्या बंगल्याच्या पाठिमागील गेटवर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. येथील घरातून महिला बाहेर येत असून या महिलांकडे एक कार्ड आणि बंद पाकीत आढळून येत आहे. या बंद पाकिटातून महिलांना 1100 रुपये देण्यात येत आहेत.