maharashtra

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली तरीही आ.मोहिते-पाटलांवर कारवाई होणारच 

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांची स्पष्टोक्ती 

सांगोला / प्रतिनिधी :-  विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, आ.मोहिते- पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून आम्ही एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी यावरून पक्षहिताचे काम केलेले आहे हे दिसून येत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावर योग्य ती भूमिका घेतील आणि भाजपच्या विरोधात काम करणाऱ्या आ.रणजितसिंह मोहिते-पाटलांवर कारवाई करतील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली तरीही पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आ. रणजितसिंह मोहिते- पाटलांवर कारवाई होणारच अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.

यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने चंद्रशेखर बावनकुळे हे कोणाचीही भेट टाळू शकत नाहीत. आ.रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल करून प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकीकडे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी पुढाकार घ्यायचा आणि दुसरीकडे पक्षातून निलंबनाची कारवाई होऊ नये यासाठी सहनभुती मिळवण्यासाठी भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे फोटो व्हायरल करायचे अशी दुटप्पी भूमिका आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतली आहे.

विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव करण्यासाठी

विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विरोधकांना साथ दिली. त्यामुळे माळशिरस विधानसभेत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांना तत्काळ भाजपमधून बडतर्फ करावे, अशी मागणी राम सातपुते यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी केली होती.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणारे मोहिते पाटील यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिम भागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

भाजपच्या विरोधात काम केल्याने बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता असल्याने आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून आम्ही भाजप सोबत एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावर योग्य ती भूमिका घेतील आणि भाजपच्या विरोधात काम करणाऱ्या आ.रणजितसिंह मोहिते-पाटलांवर कारवाई करतील. विधानसभा निवडणुकीत जे जे चुकीचं वागलेत, त्या सर्वांना त्यांची जागा दाखवली जाईल, त्यांची भाजपतून लवकरच बडतर्फी होईल. तसेच भाजप विरोधी कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.

Related Articles

Back to top button