maharashtrapoliticaltop news

अजित पवारांना सोबत घेणार का? शरद पवारांच्या वक्तव्याने पुन्हा राजकारणाला कलाटणी!

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले ४० आमदार, लोकसभा निवडणुकीत मिळालेलं मोठं यश आणि राजकारणातला अनेक दशकांचा अनुभव अशा अनेक पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुळ राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अख्खा महाराष्ट्र पालथा घालत आहेत. पुतण्या अजितदादांसोबत गेलेल्या वरिष्ठ नेते मंडळींच्या आणि आमदारांच्या मतदारसंघात जाऊन ‘गद्दारांना आता माफी नाही’ असं म्हणत थेट खोडावर घाव घालण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत.

याचदरम्यान निवडणूक निकालानंतर अजित पवार हे भूमिका बदलतील आणि भाजपची साथ सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे येतील, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे नसून ते एकच आहेत, असेही अधूनमधून लोक बोलत असतात. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना सोबत घेणार का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीची तयारी, उमेदवारांची निवड, फुटीर आमदारांबद्दलची भूमिका, महाराष्ट्रातले वातावरण अशा विविध विषयांवर ‘बोल भिडू’ला शरद पवार यांनी विशेष मुलाखत दिली.

शरद पवार म्हणाले की, ”हा काय माफी किंवा कोण दोषी असा प्रश्न नाही. प्रश्न फक्त एकच आहे की तुमची विचारधारा, आज ज्यांच्या मताची विचारधारा आम्हाला मंजूर नाही. आमची विचारधारा त्यांना मंजूर नाही, असं म्हणता येणार नाही. कारण ५-५ वेळेला आमच्या विचारधारेचा आमचा कार्यक्रम घेऊन ते निवडून येऊन सत्तेत बसले. आता काही आमचं धोरण काही बदलवलं असं काही नाहीय आणि त्यामुळे जोपर्यंत ज्या विचारधारेचा आमचा सक्त विरोध आहे. त्यांच्याबरोबर जाऊन बसणे आणि त्यांच्यासोबत काम करणं हे भूमिका असेल, तर कुणालाचा प्रवेश नाही. अजित पवार असं नाही, कुणालाच नाही. जर आमच्यासारखी त्यांची विचारधारा असेल तर त्या ठिकाणी कुणाची अडवणूक केली जाणार नाही”. असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. भाजपासोबत सत्तेत बसणार नाही, अशी भूमिका घेऊन जर पुन्हा मूळ विचारसरणी स्वीकारली तर कुणाची अडवणूक करणार नाही, असे उघडपणे शरद पवार यांनी सांगितल्याने निवडणूक निकालानंतर राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही मतदारसंघात फिरताय, आणि काही लोक म्हणताय की, ”म्हातारं जिकडे फिरतंय, तिकडे चांगभलं होतंय”. यावर प्रश्न विचारला असता शरद पवारांनी थोडं हास्य केलं आणि म्हणाले, ”माझं वय ८४ झालंय, त्यामुळे माझा उल्लेख कोण कसं करतं याच्याबद्दल काही तक्रार करायचं कारण नाही. म्हातारं ठिक आहे, म्हातार आहेच, आता ८४ वय काही कमी आहे का? एक काळ तर असा होता की, साठी झाली की लोक म्हणायचे आता थांबलं पाहिजे. पण मी काम करत राहतो आणि काम करत राहणार. लोकांनी हे अनेक वर्ष पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या काम करण्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन हा महाराष्ट्रात लोकांना पसंत आहे आणि त्यांनी पाहिलेलं आहे”, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

 

Related Articles

Back to top button