छगन भुजबळांच्या कथित दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीआधी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात दिलेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळांनी भाजपसोबतच्या वाटाघाटीवर भाष्य केलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची कारवाई झाली. त्यांच्या इमारतीमधील चार मजले ईडीने जप्त केले. सुनील तटकरे यांचीही ईडी चौकशी सुरू झाली होती. या तिन्ही नेत्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करू, अशी शरद पवारांकडे बाजू मांडली होती. शरद पवारांनी भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्यानंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या. भाजपबरोबर हातमिळवणी करण्याच्या बदल्यात ईडीची चौकशी सुरू असलेल्या नेत्यांची प्रकरणे बंद केली जातील आणि त्यासाठी यंत्रणेकडून पाठपुरावा केला जाणार नाही. पण प्रफुल्ल पटेल यांनी या दाव्याचा इन्कार केला. आमच्यासमोर विखुरलेले विरोधक की स्थिर सरकार देणारे मोदी असे दोन पर्याय होते. आम्ही स्थिर सरकारला प्राधान्य दिले, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.
अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते-
छगन भुजबळ इतकेच बोलून थांबत नाहीत. ‘दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी 100 कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती’, असे सांगून भुजबळ हे देशमुख यांच्या आरोपांचा दाखला देतात. ‘तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल’, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता, असा त्यांचा आरोप आहे. तेव्हा आता ते मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत, अशी भुजबळांची प्रतिक्रिया होती. ‘अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही’, असे भुजबळ म्हणतात. तसेच अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय पर्याय नव्हता, असंही छगन भुजबळांनी या पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.