शॉर्टसर्किटमुळे दोन दुकानांना भीषण आग; 27 लाखांचे नुकसान
सांगोला : शॉर्टसर्किट होऊन किराणा माल स्वीट मार्टसह स्टेशनरी दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानातील रोख 25 हजार रुपये, किराणा माल, 4 फ्रीज, 4 काउंटरसह खाद्यपदार्थ, स्टेशनरी साहित्य व शेजारील चहाच्या हॉटेलमधील मिठाईचे खाद्यपदार्थ, फ्रीज, टेबल-खुर्चा जळून खाक झाल्याने सुमारे 27 लाख 28 हजार 700 रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी 6 वाजता वाढेगाव, ता. सांगोला येथील ग्रामपंचायत गाळा नं. 4 मधील दोन दुकानांत घडली.
सुदैवाने या आगीतून किराणा मालाच्या दुकानासह इतर दुकाने बचावली आहेत. दरम्यान, स्वीट मार्टमध्ये आग लागल्याचे पाहून ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे सांगोला नगर परिषदेचा अग्निशमन बंब बोलावून दोन्ही दुकानांतील आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.
वाढेगाव येथील अमोल भोसले यांचे बस स्टॅण्ड चौकातील वाढेगाव ग्रामपंचायत गाळा नं. 4 मध्ये किराणा मालाचे दुकान, स्टेशनरी साहित्यासह दादा स्वीट मार्ट या नावाने दुकाने असून, त्यांच्या शेजारी दत्तात्रय कुंभार यांचे चहा खाद्यपदार्थांचे हॉटेल आहे. सोमवारी सकाळी 6 वाजता अमोल भोसले भाजीपाला आणण्यासाठी सांगोला येथे गेले होते. पाठीमागे त्यांच्या दुकानात इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन दुकानात आग लागली. यावेळी चौकातील ग्रामस्थांनी दुकानातील आग पाहून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ग्रामस्थांचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. अखेर सांगोला नगर परिषदेकडील अग्निशमन बंब बोलावून दुकानातील आग आटोक्यात आणली.
तलाठी विजय कुदळे यांनी जळीतग्रस्त दोन्ही दुकानांतील साहित्याचा पंचनामा केला असून, शासकीय मदतीसाठी तहसील कार्यालय सांगोला येथे पाठवून दिला.