महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या अन्न भेसळीविरोधातील कारवाईमुळे चर्चेत आहेत. अन्न सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी नागरिकांनी केवळ बाहेरच्या खाद्यपदार्थांकडे लक्ष न देता घरातील अन्नपदार्थांचीही तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.
तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, नागरिकांनी आपल्या घरातील फ्रीज उघडून पाहिला तर अनेकदा मुदत संपलेले मसाले किंवा इतर खाद्यपदार्थ आढळू शकतात. त्यामुळे अन्न सुरक्षेचे नियम केवळ हॉटेल किंवा बाहेरचे खाद्यपदार्थ खाताना पाळणे पुरेसे नाही, तर घरातही त्याबाबत काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, 2006 मध्ये अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आला तेव्हा ऑनलाइन फूड डिलिव्हरी, क्लाऊड किचन आणि डार्क स्टोअर्स यांसारख्या संकल्पना मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात नव्हत्या. मात्र आता खाद्य व्यवसायाचे स्वरूप बदलले असल्याने नव्या आव्हानांसाठी स्वतंत्र आणि अद्ययावत नियमावलीची गरज असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याच्या किमतीबाबतही त्यांनी केंद्र सरकारला अहवाल दिल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही वैद्यकीय साहित्यावर 150 टक्क्यांपासून 2800 टक्क्यांपर्यंत नफा आकारला जात असल्याचे अहवालातील डेटावरून दिसून आले आहे.
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची तपासणी आणि कारवाई वाढवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. अन्न सुरक्षेचा संबंध कोणत्याही धर्म किंवा सणाशी नसून तो थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.











