दिपकआबा….. अख्ख्या सांगोल्याला माहित आहे- शहाजीबापूंनी उडवली दीपकआबांची खिल्ली
सोलापूर :- सांगोला विधानसभा मतदारसंघात शहाजीबापू पाटील यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली असून यावेळी त्यांनी दीपकआबा साळुंखे आणि माजी आमदार स्व.गणपतराव देशमुख यांना टार्गेट केले आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या फैरी झडतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.दीपकआबामुळे मी निवडून आलो, असे सगळीकडे सांगत आहेत. मात्र, त्यांची मला मदत झाली हे खरे आहे, पण मी गेल्या अनेक निवडणुकीमध्ये निवडून येत आहे. 1995 साली दीपकआबा साळुंखे-पाटील, आमदार गणपतराव देशमुख यांच्या गाडीमध्ये बसत होते. त्यांची गाडी देखील मी पालथी पाडून मी मुंबईला गेलो होतो, असे म्हणत शहाजीबापूंनी दीपकआबा साळुकेंवर टीका केली.
मी निवडणुकीचा महाराष्ट्र केसरी आहे आणि तुम्ही आत्ता लंगोट बांधायला शिकायला लागलाय, असा टोला शहाजीबापूंनी विरोधात असणार्या दोन्ही उमेदवारांवर लगावला. तुम्ही रिंगणात उतरला आहे. मात्र तुमचे थरथरणारे पाय जनता बघत आहे. या निवडणुकीत विजय माझाच होणार आहे. अजूनही ठाकरे गटाचे उमेदवार दीपकआबा साळुंखे यांनी विचार करावा. माझ्यासोबत यावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.