Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतिम लाभार्थ्यांची आकडेवारी समोर आली आहे. या योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र ठरल्यात.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळं (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महायुती सरकारला सत्ता मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची ठरली होती. महिला व बालविकास विभागानं या योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळावा म्हणून ई-केवायसी (Ladki Bahin Scheme EKYC) प्रक्रिया सुरु केली होती. ई-केवायसी प्रक्रियेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. या योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र ठरल्या आहेत, या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियानं वृत्त दिलं आहे. तर, 66 लाख महिलांनी ई- केवायसी प्रक्रिया न केल्यानं त्यांची नावं योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आली आहेत.
महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. राज्य सरकारकडून ही योजना सुरु करण्यात आली होती, तेव्हा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असलं पाहिजे ही प्रमुख अट होती. याशिवाय इतर अटींचा देखील समावेश होता. लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारकडून दिला जाणारा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर अपात्र लाभार्थ्यांची नावं योजनेतून वगळण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून 28 जून 2024 ला शासन निर्णय जारी करत सुरु करण्यात आली होती. या योजनेतून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. पात्र महिलांसाठी वयोमर्यादेची अट 21 ते 65 वर्ष इतकी आहे. संबंधित लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नसावं, ही प्रमुख अट या योजनेची होती.
ई-केवायसीनंतर लाभार्थी संख्येत घट
महिला व बाल विकास विभागाकडे 2 कोटी 63 लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली होती. पहिल्या हप्त्याचं वितरण केलं तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 2.47 कोटी इतकी होती. यामध्ये ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि चारचाकी वाहनं नावावर असणाऱ्या महिला, शासकीय नोकरीत असणाऱ्या महिलांची नावं कमी झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या घटली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जास्त वाढवायचा का, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं अमरावती येथे बोलताना म्हटलं होतं. लाडकी बहीण योजनेतील ई- केवायसी करण्यासाठी सरकारने सहा महिन्याची मुदत दिलेली आहे. ज्या महिलांनी एकदा केवायसी पूर्ण केली, मात्र त्यात काही उणीवा राहून गेल्यात त्यांना दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली होती.














