NCP Merger Talking: शरद पवार मोदींना भेटले अन् राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या अडलेल्या गाड्याची चक्रं फिरली, दिल्लीत हालचालींना वेग, मोठा निर्णय होण्याची शक्यता
NCP Merger Talking: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. मध्यंतरी विलिनीकरणाची मोहीम बारगळल्याचे वाटत होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या (NCP Merger) प्रक्रियेने पुन्हा वेग धरला आहे. यासंदर्भात दिल्लीत एक महत्त्वाची घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. पार्थ पवार (Parth Pawar) आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतल्याचे समजते. या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics news)
दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु असताना बुधवारी शरद पवार यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चाही झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल पटेल हे दोघे शरद पवारांना भेटायला गेल्याने मोदींच्या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चक्रं फिरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून संसदेत येऊन घातलेल्या लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएसोबत जाण्याची चर्चा सातत्याने सुरु आहे. भाजप श्रेष्ठींनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होऊनच एनडीएमध्ये येण्याची अट घातल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र, सुनेत्रा पवारांचा विलिनीकरणाला विरोध असल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार व प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्याच्या वृत्ताला प्रफुल पटेल यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दुजोरा दिला आहे.
याशिवाय, अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात तटकरे यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र, गेल्या काही दिवसांतील या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.
Revati Sule Wedding: पंतप्रधान मोदी आणि अमित शाह रेवती सुळेंच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला जाणार
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नानंतर 10 ऑगस्टला दिल्लीत रिसेप्शन पार पडणार आहे. सुप्रिया सुळे या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी सोमवारी अमित शाह यांना भेटल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधीसह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांच्या 6 जनपथ निवासस्थानी रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येईल. तसेच भाजपचे प्रमुख नेतेही या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने या सगळ्यापाठी अनेक राजकीय कंगोरे असल्याचे दिसत आहे.

















