मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, शिवसेनेत पहिला राजीनामा पडला, नरेंद्र भोंडेकरांचा मोठा निर्णय
भंडारा/ नागपूर : मंत्रिपद नं मिळाल्यानं नाराज असलेल्या भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार भोंडेकरांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, शपथविधी थोड्या वेळानं होणार आहे,त्यापूर्वी नाराजी नाट्य पाहायला मिळालं आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. एकनाथ शिंदे भोंडेकरांच्या निर्णयावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.
शिवेसना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रिपद नं मिळाल्यानं नाराज होत शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भोंडेकर यांनी निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली होती. निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आता मंत्री मंडळात त्यांना स्थान नं मिळाल्याने भोंडेकर यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.