निवडणूक पद्धतीत बदल करा, शरद पवार कडाडले; आकडेवारी देऊन उघड पोलखोल
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकासाआघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा यावेळी पराभव झाला. यानंतर आता अनेक नेते आमदार निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आहेत. तसेच सर्वसामान्य लोकांकडूनही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान घेतले होते. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केली. आता यावरुनच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणूक पद्धतीत बदल करा, असा शब्दात शरद पवारांनी आक्षेप नोंदवला आहे.
शरद पवारांनी नुकतंच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी जाहीर भाषण केले. या भाषणावेळी शरद पवारांनी मारकडवाडी गावाचे कौतुक केले. “मतदान झालं म्हणून तुम्ही समाधानी होता. पण काही निकाल आले ज्यामुळे तुमच्या मनात शंका आली. अनेकांच्या मनात शंका आली. ते अस्वस्थ झाले. त्यात दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. ही भावना लोकांच्या मनात आलं”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
“एका महत्त्वाच्या आणि संबंध देशात ज्याची चर्चा सुरू आहे. त्या प्रश्नासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहोत. मी तुम्हाला धन्यवाद देतो. या महत्त्वाच्या प्रश्नासाठी संबंध देशाला तुम्ही जागं केलं. लोकसभेत धैर्यशील मोहिते आहेत. राज्यसभेत मी आहे. आम्ही गेली दोन तीन दिवस बघतोय तिकडे अनेक राज्याचे खासदार भेटतात. ते दुसरी काही चर्चा करत नाहीत. ते तुमच्या गावाची चर्चा करतात. हे गाव आहे कुठं असं विचारतात. लोकांच्या लक्षात आलं नाही ते या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आलं असं विचारत आहे. देश तुमचं अभिनंदन करत आहेत”, असे शरद पवार म्हणाले.
“काही निकाल आले ज्यामुळे तुमच्या मनात शंका आली”
परवा निवडणूक झाली. निकाल लागतात. लोक निवडून येतात. कधी पराभव होतो. काही तक्रारी येतात नाही असं नाही. पण राज्याला निवडणुकीची अस्था असताना त्यांच्या मनात शंका का येते याचा अर्थ निवडणूक पद्धतीत काही शंका निर्माण झाली. आणि मतदारांना खात्री वाटायला लागली. आता आपण ईव्हीएमद्वारे मतदान घेतो. तुम्ही बटन दाबता. त्यानंतर तुम्हाला कळतं. मतदान झालं म्हणून तुम्ही समाधानी होता. पण काही निकाल आले ज्यामुळे तुमच्या मनात शंका आली. अनेकांच्या मनात शंका आली. ते अस्वस्थ झाले. त्यात दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. ही भावना लोकांच्या मनात आलं, असेही शरद पवारांनी म्हटले.
“देशाच्या निवडणूक पद्धतीत बदल केला पाहिजे”
“जगातील मोठा देश अमेरिका आहे. अमेरिकेत मत मतपेटीत टाकलं जातं. दुसरा मोठा देश इंग्लंड. तिथेही मत मतपेटीत टाकलं जातं. यूरोप खंडातील सर्व देश आपल्या सारखे ईव्हीएमवर जात नाही. अमेरिका आणि काही देशांनी ईव्हीएमचा निर्णय घेतला. पण नंतर त्यांनी बदलला. जग असं आहे. तर भारतातच का. आपल्याकडे संख्या आली. लोक अस्वस्थ आहेत. काही गोष्टी दिसतात. जयंत पाटलांनी तुम्हाला आकडेवारी सांगितली. त्यात आमच्यात लक्षात आलं काही तरी गडपड आहे. आम्ही काही माहिती गोळा केली. लोकांनी मतदान केलं. पण किती लोक निवडून आले याचे आकडे या मतदानासारखे नाही. त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात शंका आहे. ही नाराजी असेल तर काय करता येईल. एकच गोष्ट आहे. आता देशात निवडणूक पद्धती स्वीकारली आहे. त्यात बदल केला पाहिजे. याबाबतची जागृती तुम्ही लोकांनी केली”, असेही शरद पवार म्हणाले.