तब्बल 1700 कोटींची कमाई करणारा ‘पुष्पा 2’ आता लवकरच ओटीटीवर; जाणून घ्या.. कुठे पाहू शकता?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत. प्रदर्शनाच्या आठ आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची क्रेझ पहायला मिळतेय. या चित्रपटाचे कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. देशभरात आतापर्यंत ‘पुष्पा 2’ने तब्बल 1232.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 1738.45 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करत आहेत. अशातच ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
सोमवारी नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर करण्यात आली. ’23 मिनिटांचा अधिक फुटेज असलेला पुष्पा 2 चा रिलोडेड व्हर्जन नेटफ्लिक्सवर पाहू शकता. तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत तुम्ही हा चित्रपट पाहू शकता’, अशी ही पोस्ट आहे. मात्र नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हिंदी व्हर्जन पाहता येणार नाही. ‘पुष्पा 2’च्या ओटीटी रिलीजची नेमकी तारीख अद्याप घोषित करण्यात आली नाही. मात्र येत्या 30 जानेवारीपासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर ‘पुष्पा 2’ हा चार भाषांमध्ये पहायला मिळणार असल्याचं कळतंय. त्याचप्रमाणे याचा हिंदी व्हर्जन कोणत्या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे.
17 जानेवारी रोजी ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाचा रिलोडेड व्हर्जन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये वीस मिनिटांनी कथा वाढवण्यात आली आहेत. म्हणजेच आता हा पूर्ण चित्रपट 3 तास 40 मिनिटांचा झाला आहे. सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ‘पुष्पा 1: द राइज’, ‘पुष्पा 2: द रुल’ या दोन चित्रपटांनंतर ‘पुष्पा 3: द रॅम्पेज’सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘पुष्पा 2’ लवकरच जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे. याआधी आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाने 1800 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर ‘पुष्पा 2’ची आतापर्यंतची कमाई 1738.45 कोटी रुपये इतकी झाली आहे. आतापर्यंत अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने ‘बाहुबली 2’, ‘केजीएफ 2’ यांचाही कमाईचा विक्रम मोडला आहे.