Raj Thackeray-Uddhav Thackeray Mumbai Morcha: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनी ‘शिलेदार’ ठरवली; 5 जुलैचा मोर्चा यशस्वी अन् भव्य करण्यासाठी दिली जबाबदारी, नावं आली समोर

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Raj Thackeray-Uddhav Thackeray Mumbai Morcha: ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षाकडून पाच जुलैचा मोर्चा यशस्वी आणि भव्य करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray Mumbai Morcha: हिंदीच्या मुद्द्याविरोधात ठाकरेंची शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षाचा एकत्र मोर्चा 5 जुलैला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्रित मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या तयारीला आता वेग आला आहे. मोर्चाचा मार्ग त्यासोबतच मोर्चाची वेळ यासंबंधी निर्णय लवकरच होणार आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या चर्चा भेटीगाठी आता सुरू झाल्या आहेत. यानंतर आता दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांवर या मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली.

ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षाकडून पाच जुलैचा मोर्चा यशस्वी आणि भव्य करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील विविध विभागात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मोर्चाची रणनीती दोन्ही पक्षाकडून ठरवली जाणार आहे. मनसेकडून संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, वरुण सरदेसाई, व इतर काही नेते नियोजनाची आणि तयारीची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मोर्चाची वेळ आणि आझाद मैदानावरील मोर्चाचा मार्ग यासंबंधी चर्चा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू आहे.

 

राज्यभरात शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त करा- उद्धव ठाकरे

हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्राच्या विरोधातील उद्याची मुंबईतील सभा आणि या शासन निर्णयाची होळी करून निषेध करण्याला सध्या प्राधान्य दिला आहे. उद्या (29 जून) मुंबईतील विविध विभागांमध्ये  त्रिभाषा सूत्राच्या सक्तीच्या शासन निर्णयाची होळी दुपारी ठिकठिकाणी करून निषेध व्यक्त केला जाणार आहे. दादरमधील प्रबोधनकार ठाकरे चौक येथे तर बांद्राच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त केला जाणार आहे. तर राज्यभरात शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त करण्याचा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक-

हिंदीसक्तीविरोधात पाच जुलैला होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक दिली जाणार आहे. मनसेकडून मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना आवाहन केलं जाईल. आज दुपारी 12 वाजता मनसे नेते संदीप देशपांडे दादर स्थानकात जाऊन प्रवाशांना आवाहन करणार आहेत. लोकलने प्रवास करणाऱ्यांनीही या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन मनसेनं केलंय.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मोर्चाचं नेतृत्व करणार-

दोघे ठाकरे बंधू मोर्चासाठी एकत्र येतायत याचा सगळ्यांना आनंद आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन मोर्चाचं नेतृत्व करतील, असंही संजय राऊतांनी सांगितले. मुंबईवर मराठी माणसांचा झेंडा फडकवायचा असेल तर बाळासाहेबांचे विचार  पाळावे लागतील. मराठी शक्तींनी एकत्र यावं, असं आवाहन संजय राऊतांनी केलं. तसेच याआधी मनसे-शिवसेना नेते एकमेकांना भेटत नव्हते. रस्ते बदलायचे. आता मराठीसाठी एकत्र येतायत, असंही संजय राऊतांनी सांगितले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon