उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरातील एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
Lucknow Coaching Centre Fire News : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरातील एक तीन मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर कोचिंग सेंटर होते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी अडकले होते. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत 15 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आगीसंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
लखनौमधील आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फोनवरून बचाव कार्याची माहिती सातत्याने घेत आहेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले की, लखनौमधील आगीत एकूण 15 मुलांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. बचावकार्य पूर्ण झाले असून, संपूर्ण सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोणालाही सोडले जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगढमधील आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते लवकरच घटनास्थळी पोहोचतील.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर
लखनौमधील आगीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
ही आग अचानक लागली. ते एक ॲनिमेशन केंद्र होते. येथे मुले ॲनिमेशन, म्हणजेच कार्टून बनवायला शिकायला येत होती. ही घटना नेमकी कशी झाली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. जखमींना केजीएमसी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले जात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रधान सचिव (गृह) आणि डीजीपी यांना घटनास्थळी बोलावून, घटनेच्या कारणांची चौकशी करण्याचे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.














