पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आंदोलनातून मागे हटू नये, असे आवाहन केले.
प्रणिती शिंदे यांनी दावा केला की, पुढील दोन ते तीन दिवसांत पोलिसांकडून आंदोलनस्थळी कारवाई होण्याची शक्यता आहे आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होऊ शकतो. मात्र, अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी आपली लढाई सुरू ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
“काही झाले तरी मागे हटायचे नाही. या लढाईत तुमचा सिंहाचा वाटा असणार आहे,” अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
दरम्यान, MPSC आंदोलनावर आज मुंबई उच्च न्यायालयातही सुनावणी झाली. न्यायालयाने विद्यार्थी समाजकंटक नसल्याचे स्पष्ट करत त्यांच्या मागण्यांचा पारदर्शकपणे विचार करण्याचे निर्देश सरकारला दिले. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असेही न्यायालयाने म्हटले. सरकारला निष्पक्ष आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेचा आराखडा तीन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुण्यातील MPSC आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. पोलिसांनी विद्यार्थी, क्लासचालक आणि अभ्यासिका संचालकांना नोटिसाही बजावल्या आहेत.










