मुंबईत CJP आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आदित्य ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात पोहोचले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी तुषार गांधी यांना तातडीने सोडण्याची मागणी केली. तसेच, त्यांना सोडले नाही तर महाराष्ट्रातील शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाला मुंबईतही पाठिंबा मिळत असताना, विविध ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरही पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणावरून पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





