महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. राज्य सरकारने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.
शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. आगामी नवरात्रोत्सव तसेच इतर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करून त्यावरील खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी वापरावा, असे त्यांनी म्हटले आहे.
पावसाअभावी खरीप हंगामावर परिणाम झाला असून रब्बी हंगामासमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही भागांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळी परिस्थितीत अन्नधान्य, जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काबाबत विविध उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शेतकरी संकटात असताना समाजातील प्रत्येकाने त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.










