Sangola Breaking News; महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, सांगोला तालुक्यातील घडामोडी पाहा एका क्लिकवर, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडे्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
ऑपरेशन सिंदूरमध्ये दणदणीत विजय; तिन्ही दलाच्या सन्मानार्थ सांगोल्यात तिरंगा रॅली संपन्न
सांगोला (प्रतिनिधी):- ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय संरक्षण दलाच्या तिन्ही दलाच्या सैनिकांनी जे शौर्य,धाडस दाखवून दणदणीत विजय संपादन केला व आपला पराक्रम सर्व जगाला दाखवून दिला याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्था, सांगोला तसेच तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक व समस्त नागरिक यांनी भव्य तिरंगा रॅली काढली होती.
तिरंगा रॅलीची सुरुवात वासुद चौक सांगोला येथून करण्यात आली. तिरंगा रॅली प्रसंगी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी कॅप्टन धनाजी पवार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व संस्थेचे उपाध्यक्ष सुभेदार मेजर रविकांत मराळ यांनी कार्यक्रमाची सांगता तसेच सेवारत सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी सुंदर शब्दात मनोगत व्यक्त केले व प्रथम भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या महात्म्यांना तसेच स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत भारत मातेच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांना 02 मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर याप्रसंगी सैन्यदलात सेवारत असणार्या व सध्या सुट्टीवर आलेल्या सैनिकांचा जय जवान माजी सैनिक सेवाभावी संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
तसेच प्रत्येक गावातून आलेल्या माजी सैनिकांविषयी डॉ.निकिताताई बाबासाहेब देशमुख यांनी आपले मनोगत खूप सुंदर शब्दात व्यक्त केले तसेच अरविंद केदार यांनी सैनिकांविषयी व माजी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी वासुद, अकोला, चिनके, पाचेगाव, हनुमंतगाव, मानेगाव, बुरंगेवाडी, जवळा, निजामपूर, सोनंद, हंगिरगे, मांजरी, बामणी, कडलास, डोंगरगाव, वाटंबरे, खर्डी, मंगळवेढा, कोळा, वाढेगाव, राजापूर इत्यादी गावाहून माजी सैनिक आले होते. सर्वात शेवटी मान्यवरांचे व आलेल्या सर्व माजी सैनिक देशप्रेमी, समस्त नागरिक, व सेवारत सैनिक यांचे आभार संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील मेजर यांनी मानले व तिरंगा रॅलीची सांगता केली.
दिशा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू – डॉ.सचिन गवळी
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला शहरातील कडलास नाका येथील दिशा हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू झाली असून याचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन डॉ. सचिन गवळी यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाची ही एक आरोग्य योजना आहे, जी राज्यातील सर्व कुटुंबांना परवडणार्या आरोग्य सेवा पुरवते. या योजनेत, प्रति कुटुंब प्रति वर्षी 5 लाख आरोग्य संरक्षण, तसेच महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. ही योजना सर्वसमावेशक असून, विविध प्रकारच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया आणि आवश्यक वैद्यकीय सेवा यांमध्ये मदत करते.
यावेळी डॉ.सचिन गवळी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सांगोला येथील दिशा हॉस्पिटलमध्ये पूर्वीपासूनच मुख्यमंत्री साह्यता निधी योजना सुरू असून या योजनेअंतर्गत सांधा रोपण शस्त्रक्रिया साठी निधी, सर्व मेडिक्लेम कॅशलेस सुविधा असून या हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारच्या फॅक्चर, अॅक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर, आर्थोस्कोपी (खांदा, गुडघा निसटणे उपचार) प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया, स्पइन सर्जरी, जबड्याची शस्त्रक्रिया, मणक्याचे सर्व आजाराचे निदान व उपचार केले जातात असेही सांगितले.
रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने तंबाखू व्यसनमुक्ती पत्रक वाटप व शपथ प्रदान
सांगोला (प्रतिनिधी):- रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्ती साठी कार्यक्रम आयोजित केला होता.
श्री शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित लोकांमध्ये तंबाखू विरोधी पत्रक वाटप करण्यात आले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यांनी लोकांना या व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले व तंबाखू व्यसना विरोधी जनजागृती करण्यात आली.
रोटरी क्लबचे सदस्य व तंबाखू नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी रो.डॉ.संदीप देवकते यांनी उपस्थिताना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ न सेवन करण्याची शपथ दिली.
या कार्यक्रमास रोटरी सचिव रो.इंजि.विलास बिले, रो.इंजि.मधुकर कांबळे, रो.माणिकराव भोसले, रो.गुलाबराव पाटील, रो.शरणाप्पा हळदीसागर, डॉ.मुजावर यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
हिंदू जनजागृती समितीचे तहसीलदार यांच्याकडे विविध मागण्यांचेे निवेदन
सांगोला (प्रतिनिधी):- आळंदी जवळील प्रस्तावित कत्तलखाना त्वरित रद्द करण्याबाबत तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा विस्तृत समर्पक आणि स्वतंत्र इतिहास समाविष्ट करण्यात यावा, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री भारत सरकार, जिल्हाधिकारी यांच्या नावे सांगोला येथे तहसीलदार यांना हिंदू जनजागृती समितीच्यावतीने नुकतेच देण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांनी हे निवेदन स्वीकारले.
यावेळी डॉ.मानस कमलापुरकर, विजयकुमार इंगोले, श्रेयश तोडकरी, अमोल मिसाळ, गणपत पटेल, बिरुदेव आगलावे, माणिक सकट, शिवाजी इंगोले, विक्रम चव्हाण, शरद गायकवाड, कैलाश राणावत, सुरज लवटे, भीमाराम चौधरी, जालिंदर मोहिते, नागनाथ बोडरे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे ना.नितेश राणे यांना भेटून आळंदी जवळील प्रस्तावित कत्तलखाना त्वरित रद्द करा, या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.
जुन्या पेन्शनचे याचिका कर्ते प्रदीप महल्लै यांची सांगोला येथे सदिच्छा भेट
सांगोला (प्रतिनिधी):- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदानावर आलेले शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचार्यांना जुनी पेंशन मिळावी याकरिता सर्वोच्च न्यायालय दिल्ली. येथे 2015 पासून सतत पाठ पुरावा करीत असलेले मुख्य याचिकाकर्ते श्री प्रदीप महल्ले, दीपक बोकडे, प्रशांत पुसदेकर, सचिन पिसे. हे दिनांक 8 जून 2025 रोजी कोल्हापूर येथे होत असलेल्या शिक्षक मेळाव्यास जात असतांना श्री अण्णासाहेब गायकवाड. सर यांचे निवासस्थानी सांगोला येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी जुनी पेन्शन बाबत चर्चा करताना सुनिल भोरे, शिक्षक नेते अण्णासाहेब गायकवाड, कृष्णदेव बेहरे, रामचंद्र जानकर, संजय वाळे, देविदास खेडकर, देवराम दरेकर, राजेंद्र जाधव इत्यादी उपस्थित होते.
मेजर हवालदार संभाजी काशीद यांचा सेवानिवृत्ती निमित्त माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने सत्कार
सांगोला (उत्तम चौगुले):- सांगोला तालुक्यातील सोनंद गावचे सुपुत्र मेजर हवालदार संभाजी बाबासाहेब काशीद हे भारतीय सेनेमध्ये 18 वर्षे सेवा देऊन निवृत्त झाले आहेत त्यानिमित्त माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
माजी सैनिक कल्याणकारी संस्था सोनंद यांनी त्यांची मिरवणूक काढून आणि सेवापूर्ती सत्कार समारंभ सोनंद येथे आयोजित केला होता. सत्कार समारंभासाठी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सैनिकासाठी जे काही मदत लागणार आहे ती यथोचित मिळेल याची ग्वाही ग्रामपंचायत तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांच्याकडे मिळेल. तसेच सैनिकासाठी तालुका स्तरावर एक ऑफिस लवकरच आमदार फंडातून कार्यान्वित होईल, असे सांगितले. यावेळी माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने मेजर हवालदार सुभाष काशीद यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन सोनंद माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. माजी सैनिकांचे सेवापूर्ती नंतर गावोगावी सत्कार होत असल्यामुळे सर्व भागांमध्ये देश प्रेम जागृती होत असल्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहे आणि त्याप्रमाणे नवी पिढी तयार होत आहे आणि तयार व्हावी यासाठी ग्रामपंचायत नगरपालिका तसेच पंचायत समिती या कार्यालयाने आशा कार्यामध्ये आपले योगदान द्यावे कारण आपणही या देशासाठी सैनिकासाठी काहीतरी करावे जेणेकरून आपली ही देशसेवा घडेल असे सामान्य नागरिकाकडून बोलले जात होते.
महावितरण कंपनीच्या बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ
सांगोला – सांगोला तालुक्यातील महावितरण कंपनीच्या बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना गेल्या तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
सांगोला तालुक्यातील महावितरण कंपनीकडे सांगोला आणि हातीद उपविभागा अंतर्गत बाह्यस्रोत कंत्राटी कामगार म्हणजेच प्रकाशदूतांची नेमणूक करण्यात आली आहे. सांगोला आणि हातीद या दोन उपविभागात मिळून बाह्यस्रोत लाईनस्टाफ 61 आणि बाह्यस्रोत ऑपरेटर 55 इतक्या कंत्राटी कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. या कामगारांना गेल्या सुमारे तीन महिन्यापासून काम करूनही पगार मिळालेला नाही. दिवस रात्र ऊन वारा पाऊस याची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता हे प्रकाशदूत कामासाठी नेहमी सज्ज असतात. या कंत्राटी कर्मचार्यांना सुमारे तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. महावितरण कंपनीत इतर कायम कर्मचार्यांचा पगारी महिना संपायच्या आत म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या 28 तारखेला पगार केला जातो. या कायम कर्मचार्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे परंतु बाह्यस्रोत अर्थात कंत्राटी कर्मचार्यांना त्यांच्या श्रमाचा पगार वेळेवर का दिला जात नाही याचे कोडे पडले आहे.
बाह्यस्रोत पद्धतीने कंत्राटी प्रकाशदूत भरण्यासाठी जी ए डिजिटल दिल्ली या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. संबंधित कंत्राटी कामगार या ठेकेदार कंपनीच्या कर्मचार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करतात.मात्र संबंधित ठेकेदार कंपनीचे कर्मचारी त्यांचा फोन घेत नाहीत. एखाद्या वेळेस फोन घेतलास तर पगाराबाबत विचारणा करणार्या कंत्राटी कामगाराला तुला कामावरून काढून टाकले जाईल अशी धमकी देतात.महावितरण कंपनीमध्ये दर्जेदार सेवा तसेच अखंडित वीजपुरवठा आणि शंभर टक्के वीज बिल वसुली करणे आदी कामे हे कंत्राटी कामगार प्रामाणिकपणे करताना दिसतात. असे असूनही त्यांच्या कामाचा मोबदला त्यांना वेळेवर दिला जात नाही.त्यांच्या पगाराबाबत ना ठेकेदार कंपनीला काळजी ना महावितरण च्या अधिकार्यांना काळजी आहे.त्यामुळे या कंत्राटी कामगारांची अवस्था ’आई जेवू देत नाही अन् बाप भीक मागू देत नाही’ अशीच झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये महावितरण प्रशासनाने वेळीच लक्ष घालून बाह्य स्रोत कंत्राटी कर्मचार्यांचा पगार तात्काळ करावा व संवेदना शून्य मजूर ठेकेदार कंपनीला वेळीच जाब विचारून त्यांच्या मजूर वृत्तीला चाप लावावा अशी मागणी कंत्राटी कर्मचार्यांमधून केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष सांगोला ते जवळा रस्त्यांची दुरावस्था; रस्ता दुरूस्त करण्याची नागरिकांची मागणी
सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला ते जवळा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांतून होत आहे.
सांगोला शहराला जोडणारा रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरील दहा गावातील नागरीकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी सांगोला शहरात यावे लागते. अशा या खड्डेमय झालेल्या रस्तावरुन जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावे लागत असून रात्रीच्या वेळी खड्डयाचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. सांगोला ते जवळा या 14 किमी अंतरावर 2 किलोमीटरच्या अंतरावरती खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे.
रस्ता वर्दळीचा असून रस्त्याने अनेकजण प्रवास करतात. नेहमीच हजारो वाहने या रस्तावरून जात येत असल्याने खड्डयामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्यामुळे दोन वाहने खड्डयामुळे व्यवस्थीत पास होऊ शकत नाहीत. एक खड्डा चुकवित असताना दुसर्या खड्डात वाहन जावून होणारा नाहक त्रास सहन करीत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नागरिक, वाहन चालक अन प्रवाशातून नाराजी दिसून येत आहे. संबंधित विभाग, लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांतून होत आहे.
कोळे येथे बकरी ईद उत्साहात साजरी
कोळे (वाहिद आतार) :- बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. बकरी ईद निमित्त कोळे येथील ईदगाह मैदान या ठिकाणी सकाळी 10 वाजता सामुहिक नमाज पठण करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बकरी ईद ची नमाज पठण करण्यासाठी कोळे, गौडवाडी, किडेबिसरी, पाचेगाव, बिहार, उत्तरप्रदेश, बेंगलोर , राजस्थान, कोलकत्ता येथील कामानिमित्त आलेले मुस्लिम कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बकरी ईद ची सुरूवात ही सामुहिक नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून बकरी ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सांगोला पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिस अधिकारी श्री.केदार भरमशेट्टी व पोलिस मित्र जूनोनीचे विलास गुळीक हे उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा
‘लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी ही युक्ती