ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ आणि पक्षबदलाच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. माध्यमांना हात जोडून, ‘मला त्या पक्षात ढकलण्याचा प्रयत्न करू नका,’ असे ते म्हणाले.

राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची जोरात चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटामध्ये इन्कमिंगही सुरू झाली आहे. खासकरून ठाकरेंच्या शिवसेनेतील लोक मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत येताना दिसत आहेत. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूही शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत सामील झाले आहेत. अनेक नेते शिंदे गटात येण्याची चर्चाही सुरू आहे. ठाकरे गटाचे काही खासदारही शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेही शिंदे गटात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत खुद्द वाकचौरे यांनाच विचारल्यावर त्यांनी माध्यमांना हातच जोडले. मलाही त्या पक्षात ढकलण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? असा चिमटाही वाकचौरे यांनी काढला.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ऑपरेशन टायगरबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी कानावर हात ठेवला. ऑपरेशन टायगर विषयी मला काही माहीती नाही. मी एकनाथ शिंदे यांना भेटलो नाही. शिंदेंना कोणते खासदार भेटले याचीही मला कल्पना नाही. मला या विषयी काही बोलायच नाही. मतदारसंघाच्या कामासाठी मंत्र्यांना भेटलो म्हणजे लगेच पक्ष सोडणार या चर्चा निरर्थक आहेत, असं भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले.
यावर काही विचारू नका
तुम्ही ठाकरे गट सोडणार आहात का? असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुम्ही मला त्या पक्षात ढकलायच्या विचारात आहात का? माध्यमांना हात जोडतो, तुम्ही यावर काही विचारू नका, असं म्हणून वाकचौरे निघून गेले.

त्यावेळी मी पंजाबला होतो
यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरे यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांत खैरे माझ्याविषयी काय बोलले हे त्यांनाच विचारा. शिर्डीतील मेळाव्यावेळी मी पार्लमेंटरी कमिटीसोबत पंजाब येथील अभ्यास दौऱ्यावर होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते खैरे?
दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे शिर्डीतील मेळाव्याला आले नव्हते. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भाऊसाहेब वाकचौरे खरं म्हणजे यायला पाहिजे होते. सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. बाकीचे नेते येतात, तुम्ही या. पण ते आले नाहीत. मी येत नाही म्हणून त्यांनी उत्तर दिलं. तरीपण आम्ही त्यांना येण्याचा निरोप पाठवला होता. पण ते आले नाही. म्हणून मी भाषणात म्हणलो, कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती करू नका. जर ते जातच असतील तर त्याला काय करणार? असं खैरे म्हणाले होते.















