कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू वालावलकर सध्या मंगळसूत्रावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे चर्चेत आहे. गळ्यात मंगळसूत्र दिसत नसल्याच्या कारणावरून काही नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर प्रश्न विचारले. त्यानंतर अंकिताने व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
अंकिताने सांगितलं की, तिचं लग्न 16 फेब्रुवारी 2025 रोजी झालं असून, लग्नानंतर एकही दिवस असा गेला नाही की तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसेल. मात्र शूटिंग किंवा एखाद्या वेगळ्या लूकच्या वेळी कपड्यांनुसार ती वेगळ्या प्रकारे तयार होते. त्यामुळे काही वेळा मंगळसूत्र दिसत नसल्याचं तिने स्पष्ट केलं.
मंगळसूत्र दिसत नसल्यावर ‘हिचं लग्न झालं आहे की नाही?’ अशा कमेंट्स केल्या जात असल्याचंही अंकिताने सांगितलं. तिने प्रश्न केला की, आपल्याला बंद गळ्याचे कपडे आवडत असतील तर केवळ मंगळसूत्र दिसावं म्हणून कपड्यांचा गळा खाली करून ते दाखवत फिरायचं का?
यानंतर अंकिताने मुद्दाम मोठं सोन्याचं मंगळसूत्र घातलं आणि आता ते सगळ्यांना स्पष्ट दिसेल, असा उपरोधिक टोला ट्रोलर्सना लगावला. “काही घातलं तरी बायका बोलतात आणि नाही घातलं तरी बायका बोलतात,” असं म्हणत तिने टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं.
इतकंच नाही तर अंकिताने तिचा पती कुणाल भगत यालाही व्हिडीओमध्ये सोबत घेतलं आणि लग्न झाल्याचं दाखवण्यासाठी त्याला मानगुटीवर बसवून ठेवू का, असा मिश्कील सवाल केला. तिच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत असून अनेक नेटकऱ्यांनी तिच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे.








