टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Crime News : दोन नवरदेवांची वरात, एकाच वधूच्या दारात; मामला गरम झाला, पोलीस म्हणाले…

Amaroha Bride Two Grooms Baraat : वधूच्या कुटुंबीयांनी आधी एका तरुणासोबत ठरलेलं लग्न रद्द केलं, नंतर दुसऱ्या वरासोबत त्याच दिवशी त्याच मुहुर्तावर लग्न निश्चित केलं होतं

बिजनौर : एकाच वधूसाठी दोन नवरदेव वरात घेऊन एकाच बँक्वेट हॉलमध्ये पोहोचल्याने रविवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये आयोजित एका लग्न समारंभात अचानक गोंधळ उडाला, त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करुन त्या वधूलाच विचारावं लागलं, की तिला नेमकं कोणाशी लग्न करायचं आहे. तिने एकाची निवड केल्यानंतर दुल्हनिया दिलवालेसोबत निघून गेली, तर नकार मिळालेला नवरदेव वरातीसह रिकाम्या हाती परतला

वधूच्या कुटुंबीयांनी मोरादाबादच्या एका व्यक्तीसोबत आधी ठरलेलं लग्न रद्द करुन संभळच्या एका वरासोबत त्याच दिवशी त्याच मुहुर्तावर लग्न निश्चित केलं होतं, मात्र त्यानंतर दोन्ही वऱ्हाडं लग्नस्थळी पोहोचल्याने हा गोंधळ सुरु झाला.

आधीचं लग्न रद्द, दुसरं लग्न ठरवलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वधूचं लग्न सुरुवातीला मोरादाबाद येथील एका व्यक्तीशी ठरलं होतं आणि या समारंभासाठी निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे हा विवाहसंबंध रद्द करण्यात आला. सामाजिक मानहानी टाळण्यासाठी लग्नाची तारीख कायम ठेवत वधूच्या कुटुंबीयांनी तातडीने संभळ येथील दुसऱ्या एका व्यक्तीशी तिचा विवाह ठरवला.

एकाच दिवशी दोन्ही नवरदेव हजर

रविवारी, संभळहून आलेली वरात सर्वप्रथम मंगल कार्यालयात पोहोचली आणि विवाहाची तयारी सुरु झाली. त्याच वेळी मोरादाबादचा वरही आपली वरात घेऊन तिथे दाखल झाला; यामुळे विवाहस्थळी तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, कारण दोन्ही बाजूंनी एकाच वधूवर आपला हक्क सांगितला.

तुला कोणाशी लग्न करायचंय?

परिस्थिती चिघळू लागताच पाहुणे आणि नातेवाईक तिथे जमा झाले; त्यानंतर मोठा संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर, पोलिसांनी दोन्ही कुटुंबांतील सदस्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर वधूला, तिला नक्की कोणाशी विवाह करायचा आहे, हे स्पष्टपणे सांगण्यास सांगितले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “आम्ही त्या तरुणीला तिच्या पसंतीबद्दल विचारले; तेव्हा तिने आपल्या कुटुंबाच्या संमतीने, संभळच्या वराशी विवाह करण्यास होकार दिला.” त्यानंतर विवाह पार पडला आणि संभळहून आलेली वरात वधूला सोबत घेऊन परतली.

वाद जागेवरच मिटला

परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर, पोलिसांनी मोरादाबादच्या नवरदेवाला आणि त्याच्या वरातीला परत पाठवून दिले. “या प्रकरणी कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, वधूने दोन्ही नवरदेवांपैकी आपली पसंती व्यक्त केल्यानंतर, हा वाद जागेवरच मिटवण्यात आला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now