maharashtrapoliticalsolapurtop news

नागपूरहून काल बॅग घेऊन निघाले, तानाजी सावंत कुठे गेले?, नाराजीच्या चर्चांवरही मोठी माहिती समोर

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (15 डिसेंबर) नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेना शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. यातीलच एक नाव म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant). तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली नसल्यानं ते नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. 

तानाजी सावंत काल शपथविधी सुरु असताना राजभवनाकडे फिरकले देखील नाही. काल तानाजी सावंत हे नागपूरच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमधून बॅग पॅक करुन निघून गेले होते. आजपासून अधिवेशन असल्याने सर्व आमदारा नागपुरात असताना तानाजी सावंत माघारी परतले होते. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. तब्येत ठीक नसल्याने तानाजी सावंत पुण्याला परतल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली. 

तानाजी सावंत नागपूरहून अचनाक का परतले?

तब्येत ठीक नसल्याने परतल्याची तानाजी सावंत यांच्या ऑफिसने माहिती दिली. कोलेस्ट्रॉल वाढल्याने डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सांगितले आहे. तसेच आपण नाराज नसल्याचे तानाजी सावंत यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सध्या तानाजी सावंत पुण्यात असल्याची माहिती मिळत आहे.

धाराशिव जिल्ह्याला मंत्रि‍पदाने दिली हुलकावणी-

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. शिंदे सरकारमधील शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला. तसेच माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते राणाजगजीतसिंह पाटील यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचाही नंबर लागला नाही. त्यामुळे धाराशिव जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला. शिंदे सरकारमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. आता धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button