maharashtrapoliticaltop news

ह्रदयद्रावक घटना, भीषण अपघातात आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा

सांगली : अपघाताच्या घटना सातत्याने घडत असून ओव्हरटेक करण्याच्या नादातच महामार्गावर अपघात होताना पाहायला मिळते. आता, शहरातील कुमठेफाटा जवळ भीषण अपघाताची घटना घडली असून आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एकजण गंभीर जखमी असून अपघातानंतर (Accident) स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आईसह 2 मुलांचं मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ओव्हरटेक करीत असताना वडापने दुचाकीला उडविल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघातामध्ये दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

तासगाव-सांगली रोडवरील कुमठेफाटा येथे ओव्हरटेक करीत असताना वडापने समोरून येणार्‍या दुचाकीला उडविल्याने आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर, सबंधित महिलेचा पती मात्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरील दाम्पत्य आपल्या मुलांसह सांगलीहून आटपाडीकडे निघाले होते. ते कुमठेफाटा येथे आले असता वळणावर भरधाव वेगाने तासगावकडून येणार्‍या वडापने ओव्हरटेक करीत असताना समोरून येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे या भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून महिलेच्या पतीवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने तीन जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे.

Related Articles

Back to top button