IMD Update: पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचे सावट, हिवाळ्यात ‘यलो अलर्ट’, थंडीचा जोर कमी
फेंगल चक्रीवादळानंतर राज्यातील वातावरणात बदल होत आहे. कधी थंडी तर कधी आभाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील काही भागांत पाऊस पडत आहे. आता कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचे सावट असून काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यात असलेला थंडीचा जोर कमी झाला आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
पुढील ४८ तासांत कोकण गोव्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० एवढा असेल.
पुण्यात पावसाचा सरी पडणार
पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील दोन दिवस हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील.जिल्ह्यातील काही भागातच्या पावसाच्या हलक्या सरी पडतील. शुक्रवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. कमाल व किमान तापमान स्थिर असल्यामुळे काल दिवसभर शहरात चांगलाच उकाडा जाणवत होता.
गोंदिया जिल्ह्यात पाऊस
गोंदिया जिल्ह्यात चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे धान पिकाबरोबर भाजीपाला आणि तुर पिकांचे नुकसान होणार आहे. कापलेला धान या पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहेत. या पावसामुळे भाजीपाला, तुर पीक यांना सुद्धा फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत आला आहे.
धारशिवमध्ये पाऊस
धाराशिव शहरासह तुळजापूर तालुक्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर पाऊस आल्याने शेतीचे नुकसान होणार आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांना हा पाऊस धोकादायक ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढल्याचे दिसत आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठी घट होणार आहे.