top news
ब्रेकिंग! पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर मोठा राडा
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत आहे. यात महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव येऊन न देण्याचा इशारा देणाऱ्या कन्नड रक्षक वेदिका संघटनेने आता महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केला आहे. यात महाराष्ट्रातील दहा वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांवर कन्नड वेदिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केला आहे. कर्नाटकातील हिरेबागेवाडी या ठिकाणी महाराष्ट्रातील वाहनांवर हा हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिकाच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
कर्नाटकच्या या हल्ल्यामुळे आता महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली, यावेळी बोम्मई यांनी महाराष्ट्रातील वाहनांच्या तोडफोडीबद्दल निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातही आंदोलन झाले. पुण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर जात कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसला काळे फासले आहे. यावेळी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. हे आंदोलन अधिक चिघळून नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
या घटनेनंतर महाराष्ट्र एसटी महामंडळाने आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या एसटी बस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. कर्नाटक एसटी महामंडळानेही महाराष्ट्रात जाणाऱ्या एसटी बस सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.