महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या विविध कारवायांमुळे चर्चेत आहेत. भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करत असतानाच आता पान मसाला आणि गुटख्याच्या जाहिरातींच्या मुद्द्यावरून त्यांनी सेलिब्रिटींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
पान मसाल्याच्या जाहिरातीप्रकरणी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना FDA कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. संबंधित जाहिरातींशी निगडित प्रचारात्मक मजकूर सोशल मीडिया खात्यांवरून हटवण्याबाबतही निर्देश देण्यात आले होते.
या कारवाईबाबत बोलताना तुकाराम मुंढे यांनी जाहिराती करणाऱ्या कलाकारांच्या सामाजिक जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला. एखादी व्यक्ती एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असेल, तर त्या उत्पादनाबाबतची जबाबदारी केवळ कंपनीची नसून जाहिरात करणाऱ्या व्यक्तीचीही असते, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पान किंवा गुटख्याच्या जाहिरातीचा संदर्भ देताना मुंढे यांनी कलाकारांना थेट सवाल केला. जर एखादे उत्पादन चांगले असल्याचे सांगून त्याचा प्रचार केला जात असेल, तर ते उत्पादन स्वतः आणि आपल्या कुटुंबीयांनीही स्वीकारण्याची तयारी असायला हवी, असा त्यांचा युक्तिवाद होता.
त्यांनी जाहिरातीतील कलाकार हा केवळ ‘चेहरा’ असल्याचा युक्तिवादही मान्य नसल्याचे स्पष्ट केले. प्रसिद्ध व्यक्ती आणि इन्फ्लुएन्सर्सचा समाजावर प्रभाव असतो. त्यामुळे ते ज्या उत्पादनाचा प्रचार करतात, त्याबाबत त्यांचीही जबाबदारी असते, असे मुंढे यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनी FDA च्या नोटिशींना उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोन कलाकारांची सुनावणीही पूर्ण झाली आहे. मात्र पुढील कायदेशीर आणि विभागीय प्रक्रिया अद्याप सुरू असून अंतिम निर्णय झालेला नाही.









