टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

Follow Us:

मेडशिंगी, आगलावेवाडीत दोन बंद घरे फोडली; ९ लाख ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

सांगोला | प्रतिनिधी

सांगोला तालुक्यातील मेडशिंगी आणि जवळा येथील आगलावेवाडी परिसरात बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून, दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ९ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

मेडशिंगी येथे बंद घर फोडून पावणेसहा लाखांचा ऐवज लंपास

मेडशिंगी येथे बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी दिलीप भीमराव गाडेकर (वय ६५, रा. मेडशिंगी, ता. सांगोला) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी आठच्या सुमारास गाडेकर हे पत्नीसमवेत मुंबई येथे मुलाकडे गेले होते. घराला कुलूप लावून त्यांनी दररोज घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. दि. ७ ऑगस्ट रोजी त्यांच्या बहिणीने फोन करून घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केल्याचे सांगितले. तसेच बेडरूममधील लोखंडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचेही निदर्शनास आले.

दि. ८ ऑगस्ट रोजी गाडेकर यांनी घरी येऊन पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे आढळून आले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये ७ हजार रुपये रोख, ५ तोळे ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या दोन अंगठ्या, बोरमाळ, लक्ष्मीहार, सोन्याचे इतर दागिने, चैन-पेंडल, मोहनमाळ व सोन्याचा हार यांचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत ५ लाख ७५ हजार रुपये आहे.

आगलावेवाडीत घरफोडी; ३ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास

दरम्यान, जवळा येथील आगलावेवाडी येथेही बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विठोबा गवंड (वय ७४, रा. आगलावेवाडी, जवळा, ता. सांगोला) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गवंड हे पत्नी व नातेवाईकांसह यलमार मंगवाडी येथे गेले होते. घर बंद करून जाताना त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने कपाटात ठेवून कपाटाला कुलूप लावले होते.

दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या पुतण्याने फोन करून काही कागदपत्रे कोरडा नदीच्या काठावर पडलेली असल्याचे सांगितले. त्यानंतर गवंड घरी परतले असता कपाटाचे कुलूप तुटलेले व घरातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, तीन तोळ्यांची सोन्याची चैन, अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, चार तोळ्यांचे चांदीचे ब्रासलेट आणि ३५ हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज आहे.

या दोन्ही घटनांप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. सलग घडलेल्या या घरफोड्यांमुळे मेडशिंगी, जवळा व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now