सांगोला : सांगोला तालुक्यातील कडलास गावाजवळ अज्ञात चार दरोडेखोरांनी फळांनी भरलेली पिकअप अडवून चालकास स्टीलच्या रॉडने मारहाण करत वाहनासह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 30) मध्यरात्री घडली. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू राज्यातील कृष्णगिरी जिल्ह्यातील अरूल वेल्याअपन्न (वय 36, व्यवसाय चालक) यांनी फिर्याद दिली आहे. ते पिकअप (क्रमांक TN-24 इ-) मधून डाळिंब, पेरू व ड्रॅगन फळे घेऊन जात होते. दि. 30 जुलै रोजी पहाटे सुमारे 1.45 वाजण्याच्या सुमारास कडलास गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दोन मोटारसायकलींवरून आलेल्या अज्ञात चार इसमांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला.

दरोडेखोरांनी चालकास वाहन थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर चालक व सोबतच्या व्यक्तींना जबरदस्तीने खाली उतरवून स्टीलच्या रॉडने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत पिकअप वाहन, त्यामधील फळांचा माल तसेच मोबाईल फोन असा एकूण सुमारे 6 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लंपास केला.
लंपास करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे 80 कॅरेट डाळिंब (1.70 लाख रुपये), 25 कॅरेट पेरू (65 हजार रुपये), 22 कॅरेट ड्रॅगन फळ (25 हजार रुपये), महिंद्रा पिकअप वाहन (4 लाख रुपये) तसेच व्हिवो कंपनीचा मोबाईल (10 हजार रुपये) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.
















